पोटखरेदीदारांकडून परप्रांतीय व्यापार्‍यांची लूट

पोटखरेदीदारांकडून परप्रांतीय व्यापार्‍यांची लूट
देशदूत न्यूज अपडेट

लासलगाव | वार्ताहर | Lasalgoan

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत खरेदीचा परवाना असला तरी प्रत्यक्ष लिलावात (Auction) सहभागी होण्यासाठी व्यापारी असोसिएशनची परवानगी लागते. त्यामुळे अनेक नवीन व्यापारी असोसिएशनच्या सभासदांकडे पोटखरेदीदार म्हणून काम पाहतात...

परंतु काही पोटखरेदीदारांकडून (sub Ordinate buyers) परराज्यांतील व्यापार्‍यांना वेगवेगळ्या माध्यमांतून आकर्षित करून त्यांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढीस लागले असून यामुळे बाजार समिती प्रशासन व व्यापारी असोसिएशनची (Trader Association) चिंता वाढली आहे.

लासलगाव मुख्य बाजारआवाराबरोबर निफाड (Niphad) व विंचूर (Vinchur) उपबाजार आवार तसेच उगाव, नैताळे, खानगाव नजीक येथील तात्पुरत्या खरेदी विक्री केंद्रांवर विविध शेतीमालाच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार चालतात.

तर लासलगाव बाजारपेठेत निर्यातक्षम कांदा व परराज्यातील महत्त्वाचे मोठ्या शहरात तसेच पंचतारांकित मोठ्या हॉटेलकरिता लागणारा कांदा विकला जातो.

लासलगाव बाजार समितीच्या (Lasalgaon Market Committee) वतीने व्यापार्‍यांना खरेदी अनुज्ञप्ती दिली जाते. संबंधित व्यापार्‍याकडे तसा परवाना असला तरीही लासलगाव व्यापारी असोसिएशनने लिलावात परवानगी दिली तरच त्यास प्रत्यक्ष लिलावात बोली लावता येते.

या कार्यपद्धतीवरच येथील दैनंदिन लिलावाचे कामकाज चालते. त्यावरून आजवर लासलगाव बाजार समितीचे प्रशासन व व्यापारी असोसिएशनला टीकेला सामोरे जावे लागले आहे.

कांदा खरेदी करून बाजार समितीतील अधिकृत खरेदीदार असल्याचे परराज्यातील व्यापार्‍यांना भासवून अथवा बाजार समिती आवाराच्या रोडलगत खळे टाकून परराज्यातील कांदा व्यापार्‍यांना आकर्षित करीत असतात.

त्यांच्याशी संपर्क झाल्यानंतर त्यांच्याकडून कांदा खरेदीसाठी अगोदर बँक खात्यात पैसे मागवून निकृष्ट प्रतीचा माल पाठवून अथवा माल न पाठवताच हातचलाखीने पैसे कमावण्याची नवी पद्धती येथे सुरू झाली आहे. त्यातून अनेक जण स्वत:चे उखळ पांढरे करून घेत आहेत. नुकतीच परराज्यातील एका बँकेलाही या प्रकाराची झळ बसली आहे.

कारवाईची मागणी

लासलगाव बाजार समितीचा किंवा शासनाच्या कोणत्याही व्यापार्‍याचा परवाना न घेता व्यापारी प्रतिमा निर्माण करून एखाद्या दोन व्यवहाराची पद्धत वापरून थेट लाखो रुपयांना परप्रांतीय कांदा मागणीदारांना किंवा व्यापार्‍यांना गंडा घातला जात आहे.

अशा तथाकथित व्यापारी यांचा सहकार व पणन खात्याने तसेच पोलिसांनी शोध घेऊन त्यांचेवर वेळीच कार्यवाही केली पाहिजे अशी मागणी होत आहे. या व्यापारी फसवणूक प्रकारामुळे बाजार समिती प्रशासन आणि व्यापारी असोसिएशन यांच्यापुढे आव्हान उभे ठाकले असून अशा पोट खातेदारांवर तत्काळ कारवाई होणे गरजेचे आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com