गुंडांचा धुडगूस; व्यापारी संघटनेकडून कडकडीत बंद

गुंडांचा धुडगूस; व्यापारी संघटनेकडून कडकडीत बंद

chaos by goons; Strictly closed by trade association

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

गावगुंडांतर्फे काल रात्री बाजारपेठेत आरडाओरड करत व्यापार्‍यांना शिवीगाळ व दमबाजी करण्यात आली. सण-उत्सव येताच गावगुंड दहशत निर्माण करत त्रास देण्यास सुरू करत असल्याने संतप्त झालेल्या व्यापार्‍यांनी काल रावळगाव येथे कडकडीत बंद पाळत गुंडांच्या दहशतीचा निषेध केला. एकही दुकान सुरू नसल्याने गावात शुकशुकाट पसरला होता. व्यापारी संघटनेतर्फे पोलीस अधिकार्‍यांना निवेदन देण्यात येऊन गुंडांवर कारवाईची मागणी केली गेली.

रावळगाव येथे काल सायंकाळी बाजारपेठेत अविनाश अहिरे याच्यासह अन्य गावगुंडांतर्फे आरडाओरड करण्यात येऊन व्यापार्‍यांना शिवीगाळ व दमबाजी केली गेली. दसरा, दिवाळी अथवा इतर सण येताच गुंडांतर्फे व्यापार्‍यांना दमबाजी व त्रास देण्याचे प्रकार यापूर्वीदेखील गावात घडले होते. काल पुन्हा शिवीगाळ व दमबाजी गुंडांतर्फे केली गेल्याने संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली होती. गुंडांतर्फे सातत्याने होत असलेल्या दमबाजीच्या निषेधार्थ संतप्त झालेल्या व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने आज रावळगावी कडकडीत बंद पाळला. सर्व व्यापारी प्रतिष्ठाने बंद असल्याने गावात शुकशुकाट पसरला होता. सर्व व्यापारी प्रतिष्ठाने बंद असल्यामुळे बाहेरगावाहून खरेदीसाठी आलेल्या ग्रामस्थांचे हाल झाले.

संतप्त व्यापार्‍यांनी वडनेर-खाकुर्डी पो.नि. देवेंद्र शिंदे यांची भेट घेत निवेदन सादर केले. अविनाश अहिरे याच्यासह अन्य गावगुंडांचा पोलिसांनी त्वरित बंदोबस्त करत त्यांच्या त्रासापासून मुक्तता द्यावी, अशी मागणी व्यापार्‍यांतर्फे केली गेली. यावेळी सोमनाथ बनकर, दीपक दंडगव्हाळ, संजय अमृतकर, राहुल कानडे, पंकज कासार, रिकेशसिंह ठाकोर, चेतन चव्हाण, सुनील बोरसे, किरण पुरोहित, दिनेश शिरूडे, नीलेश शिल्लक, अरुण जगताप, जयेश बिरारी, संजय अग्रवाल, दीपक चव्हाण, शिवाजी कानडे, दिनेश देवरे, महेश बागुल, दीपक चित्ते आदींसह गावातील सर्व व्यापारी उपस्थित होते.

दरम्यान, मराठा महासंघाच्या पदाधिकार्‍यांनी रावळगाव ग्रामस्थांतर्फे पोलीस अधिकार्‍यांना निवेदन देत गावातील नागरिकांवर प्राणघातक हल्ले करणे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विटंबना करणार्‍या अविनाश अहिरे या व्यक्तीने पुन्हा गावात दहशत निर्माण करत व्यापार्‍यांना तसेच ग्रामस्थांना त्रास देण्याचा उद्योग केला आहे. या घटनेने गावात दहशतीचे वातावरण पसरले असून सामाजिक सलोखा बिघडू शकतो हे लक्षात घेत सदर व्यक्तीवर तातडीने कारवाई करावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा स.पो.नि. देवेंद्र शिंदे यांना निवेदन देत महासंघाचे उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस अमोल निकम, शहराध्यक्ष नितीन पाटील, एकनाथ पगारे, गोकुळ पवार, नारायण पवार, राजेंद्र पवार, विनोद सूर्यवंशी, सोमनाथ बनकर, सुनील बोरसे, गोकुळ दादाजी आदींनी दिला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com