मुलांच्या मानसिकता बदलाला प्राधान्य द्यावे लागेल!

मुलांच्या मानसिकता बदलाला प्राधान्य द्यावे लागेल!

सरिता पगारे | Sarita Pagare | Clinical Psychologist

अखेर दीड वर्षांनी शाळा सुरू झाल्या आहेत. विद्यार्थी वेगवेगळ्या मानसिकतेतून शाळेत येत आहेत. याच्या विविध शक्यता आहेत. एखाद्या विद्यार्थ्याने करोनामुळे आपले आप्तेष्ट गमावले असतील. काही मुलांनी घरगुती हिंसाचाराचा दुर्दैवी अनुभव घेतला असेल किंवा ज्यांच्या घरात खूप छान वातावरण असेल अशा विद्यार्थ्यांचे त्यांच्या पालकांशी जवळीक (बॉडिंग) झाले असेल. काही विद्यार्थ्यांना एकटेपणा सोसावा लागला असेल. या सर्व शक्यतांचे मनावर झालेले नकारात्मक आणि होकारात्मक परिणाम घेऊन मुले शाळेत येत आहेत.

हीच बाब शिक्षकांना देखील काही अंशी लागू होते. कारण करोनाचे प्रत्येक कुटुंबावर कमी अधिक प्रमाणात परिणाम झाले आहेत. हे सगळे परिणाम सोबत घेऊन विद्यार्थी काही तास शाळेत बसणार आहेत. शाळेशी संबंधित सर्व घटकांसाठी हा बदल सोपा नाही. शालेय दिनक्रम सुरु करताना हे विसरता येणार नाही. लॉकडावून ही अचानकपणे उद्भवलेली परिस्थिती होती.

जी सगळ्यांसाठीच नवीन आणि पहिल्यांदाच अनुभवला आली होती. ज्याचा परिणाम मागचे दीड वर्ष शाळा बंद होत्या. त्या दृष्टीने त्यांची मानसिकता जपत त्यांना ऑफलाईन शिक्षणात आणताना अनेक प्रयोग नव्याने करावे लागतील. ऑनलाईन शिक्षणाशी हळू हळू नाळ जुळताना मुले प्रत्यक्ष शाळेत आली आहेत. लगेच पुर्ण वेळेचे तास एकाच जागी बसुन राहाणे मुलांना अशक्य वाटू शकते. त्यासाठी तासिकांचा वेळ किती असावा याचा विचार केला पाहिजे. पुस्तकी अभ्यासासोबतच प्रात्यक्षिकांवर अधिक भर दिला पाहिजे. कारण पुस्तकी अभ्यासक्रम ऑनलाईन शिकून अनेकांना तो समजलाही असेल.

पण त्या तुलनेत प्रात्यक्षिके मात्र झालेली नाहीत. अभ्यासक्रमावर तर परिणाम झालाच आहे. पण मुलांच्या जाणीवा आणि क्षमतांवरही काम करावे लागेल. मुले कदाचित लिहिणे विसरु शकतात. एका जागी बसून राहाणे त्यांच्यासाठी आता त्रासदायक असू शकते. शेअरिंग, एकमेकांची चेष्टा करणे, मनसोक्त खिदळणे, सहकार्य, धावाधाव हे जे शाळेत घडते ते थांबले होते. शिकण्यासाठी तुम्ही जितक्या जास्त जाणीवा वापराल तेवढे शिकणे जास्त प्रभावी होते असे म्हणतात. मी लिहितो, वाचतो, बघतो, ऐकता आणि बोलतो. यापद्धतीने शिकलेल्या गोष्टी मुले कधीही विसरत नाहीत. पण ऑनलाईन शिक्षणात डोळे आणि कानांचा जास्त वापर झाला. त्या तुलनेत इतर क्षमतांचा वापर कमी झाला. त्या प्रभावित झाल्या असण्याची शक्यता आहे.

ही सगळी परिस्थिती लक्षात घेऊनच शिकणे हळूहळू पूर्वपदारवर आणावे लागतील. टप्याटप्याने त्यांचे खेळणे सुरु करता येईल. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या बॅचेच करता येतील. अशाच पद्धतीने अन्य कलांचा विचार करता येईल. उदाहरणार्थ तुम्ही या दीड वर्षात काय शिकले?अनुभवले? कोणती गोष्ट तुम्ही मिस केली? कोणत्या गोष्टी शिकायचे राहिले असे वाटते? हे चित्रातून दाखवा किंवा निबंध लिहा अशी स्पर्धा घेता येईल. त्यांना गोष्टी सांगा, सांगायला लावा. यातून मुले मोकळी होतील. त्यांची मानसिकता शिक्षकांना कळेल.

मुले आणि शिक्षक खूप काळांनी एकमेकांसमोर येणार आहेत. त्यामुळे मुलांना लगेच खूप प्रश्न विचारु नयेत. दीड वर्ष तर गेलेच आहे. त्यांना शाळेत रुळण्यासाठी अजून काही काळ जाऊ द्यावा. लगेच अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या आणि परीक्षा घेण्याच्या मागे लागू नये. वर सांगितले तसे वेगवेगळ्या पद्धतीने मुलांना मोकळे करावे. त्यांच्याशी संवाद साधावा. त्यांना बोलण्याची संधी द्यावी आणि त्यांचे मनापासून ऐकून घ्यावे. लगेच क्रिटिसाईज करु नये असेच मी सुचवेन.

Related Stories

No stories found.