
नाशिक । प्रतिनिधी Nashik
माजी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Former Tourism Minister Aditya Thackeray) यांनी युवा सेनेच्या माध्यमातून लोखंडी पूल उभारत शेंद्रीपाड्यातील ( Shendripada )ग्रामस्थांना दिलासा दिला होता. परंतु पुराच्या पाण्यात हा पूलच वाहून गेल्यानंतर आता मुख्यमंत्री शिंदे ( CM Eknath Shinde )उद्या शनिवारी (दि. 30) शेंद्रीपाड्याला भेट देणार असल्याची चर्चा आहे. गायब झालेल्या पुलावरून शिंदेंकडून ठाकरेंना घेरण्याची रणनीती आखली जात आहे.
काही महिन्यांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, सुरगाणा परिसरात पाणीटंचाईचे भीषण वास्तव समोर आले होते. त्र्यंबक तालुक्यातील शेंद्रीपाडा येथील लाकडी बल्ल्यांवरून महिलांचा हंडे घेऊन जातानाचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ थेट तत्कालीन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचला होता. त्यांनी या व्हिडिओची दखल घेत युवा सेनेच्या कार्यकर्त्यांना तत्काळ घटनास्थळी जाऊन लोखंडी पूल उभारण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार येथे लोखंडी पूल देखील उभारण्यात आला होता. त्यानंतर काही दिवसांनी आदित्य ठाकरे या पुलाच्या उद्घाटनासाठी त्र्यंबकेश्वर तालुक्यात पोहोचले होते.
त्र्यंबकेश्वरमध्ये झालेल्या अतिवृष्टीत हा पूल पुराच्या पाण्यात वाहून गेला. त्यामुळे येथील महिलांना पुन्हा जीवघेणी कसरत करावी लागत आहे. पुलाअभावी ग्रामस्थांची फरपट होत असल्याने त्र्यंबकेश्वरमधील शेंद्रीपाडा पुन्हा चर्चेत आले आहे. नाशिक जिल्हा दौर्यावर येणारे मुख्यमंत्री शिंदे यांनी हा पूल तत्काळ उभारण्याचे आदेश दिले आहेत.
शिवाय या पूलाला ते भेट देण्याची शक्यता आहे. शेंद्रीपाड्याकडे जाणारा मार्ग चिखलमय झाला आहे. मुख्यमंत्र्यांचे वाहन तेथे पोहोचणार कसे याची चिंता प्रशासनाला आहे. मुख्यमंत्री शनिवारी (दि. 30) जिल्हा दौर्यावर येत आहेत. गेल्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांचे विशेष कर्तव्यावरील अधिकारी मंगेश चिवटे शेंद्रीपाडा येथील परिस्थितीची पाहणी करून गेले. त्यानंतर चिवटे यांनी बुधवारी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला. मुख्यमंत्री येथे भेट देण्याची शक्यता आहे. त्यामुळे तशी तयारी ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.
प्रशासनाला चिंता
पावसामुळे हरसूलकडे जाण्यासाठी चांगला रस्ता नाही. सावरपाड्याकडे जाणार्या दोन किलोमीटर रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य आहे. मोटरसायकलपासून ट्रॅक्टरपर्यंतचे कोणतेच वाहन या रस्त्यावरून जाऊ शकत नाही. रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी तेवढा अवधीही हाती नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा ताफा शेंद्रीपाड्यापर्यंत कसा पोहोचणार याची चिंता प्रशासनाला सतावत आहे.