नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

जिल्हा परिषदअंतर्गत विविध विकासकामांसाठी विविध विभागांना प्राप्त झालेला निधी या आर्थिक वर्षात अखर्चित राहण्याची शक्यता आहे. सन 2019-2020 या आर्थिक वर्षातील 69 टक्के इतकाच निधी मागील सप्ताहाअखेरीस खर्च झाला होता.

आर्थिक वर्ष संपण्यास चार-पाच दिवसांचाच कालावधी शिल्लक आहे. यात सुमारे 101 कोटींच्या खर्चाचे आव्हान प्रशासनासमोर आहे. शिक्षण, आरोग्य, बांधकाम व महिला-बालकल्याण विभाग निधी खर्चात पिछाडीवर आहे.

31 मार्चच्या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी मागील सप्ताहात विभाग प्रमुखांची तातडीची बैठक घेत निधी खर्चाचा आढावा घेतला. यात निधी खर्चात पिछाडीवर असलेल्या विभागप्रमुखांची कानउघाडणी करत तत्काळ निधी खर्च करण्याच्या सूचना अधिकार्यांना केल्या.

जिल्हा नियोजन समितीकडून जिल्हा परिषदेला विकासकामांसाठी निधी प्राप्त होतो. हा निधी खर्चाची जिल्हा परिषदेला दोन वर्षांची मुदत असते. सन 2019-2020 या आर्थिक वर्षातील निधी खर्चासाठी 31 मार्च ही डेडलाईन आहे.

मात्र दरवर्षीप्रमाणे विभागाकडून अद्यापही निधी खर्च झालेला नसल्याचे समोर आले आहे. प्राप्त झालेल्या निधीपैकी आतापर्यंत 69 टक्के निधी खर्च झाला असून 31 टक्के निधी अखर्चित आहे. हा अखर्चित निधी 31 मार्चपर्यंत खर्च करावा लागणार आहे. साधारण अंदाजे 101 कोटींचा निधी हा अखर्चित असल्याचे समजते.