१ ऑक्टोबरला जिल्हाभरात 'हा' उपक्रम राबवण्यात येणार

१ ऑक्टोबरला जिल्हाभरात 'हा' उपक्रम राबवण्यात येणार

नाशिक | प्रतिनिधी

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशात १ ऑक्टोंबर रोजी एक तारीख एक तास हा श्रमदानाचा उपक्रम राबविण्यात येणार असून या दिवशी सर्व गावांमध्ये सकाळी १० वाजता एकाचवेळी श्रमदान मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

नाशिक जिल्हयातील सर्व नागरिक तसेच सामाजिक संस्था, युवक मंडळे यांनी या अभियानात सहभागी होऊन आपल्या गावाच्या स्वच्छतेसाठी योगदान द्यावे असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे.

देशभरात एकाचवेळी आयोजित करण्यात आलेला हा मोठा उपक्रम असून शहर, नगरपरिषद, तसेच प्रत्येक गावांमध्ये सदरचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. सदर उपक्रमात सहभागी होण्याबाबत जिल्ह्यातील मंत्री, खासदार व आमदार यांनाही आमंत्रित करण्यात येत असून दिंडोरी येथील रामशेज येथे आयोजित कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार स्वतः सहभागी होणार असून विधानसभेचे उप सभापती नरहरी झिरवाळ यांच्यासह इतर लोकप्रतिनिधीदेखील या उपक्रमात सहभागी होणार आहेत.

१ ऑक्टोबर रोजीच्या कर्यक्रमासाठी केद्र शासनाच्या संकेतस्थळावर नाशिक जिल्हयातील सर्व महसुली गावांचे इव्हेंट तयार करून नोंदविण्यात आले आहेत. कार्यक्रम झाल्यावर कार्यक्रमस्थळाचा फोटो अपलोड करुन माहिती भरुन इव्हेंट पूर्ण करावयाचा आहे. देशाचे पंतप्रधान स्वत: श्रमदान मोहिमेत सहभागी होणार असल्याने सर्वांना उपक्रम प्रभावीपणे राबविण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

सदरचा श्रमदान कार्यक्रम गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, अंगणवाडी व शाळा परिसर, सार्वजनिक व खाजगी कार्यालयांचा परिसर, पर्यटन स्थळ, बसस्थानक, धार्मिकस्थळ, नदी किनारे इ. ठिकाणी आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

यासाठी महिला बचतगट, सर्व ग्रामपंचायत सदस्य, गावातील सर्व शासकीय कर्मचारी, युवक मंडळे, विविध विकास सोसायटीचे पदाधिकारी, विविध सामाजिक संस्था, धर्मदाय प्रतिष्ठाण इतर मंडळे व संस्था आदिंचा सहभाग घेण्याचे आवाहनही मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे.

या मोहिमेसाठी प्रत्येक गावासाठी संपर्क अधिकारी नेमण्यात आला असून जिल्हा परिषद गटस्तरावर नोडल अधिकारी व तालुका स्तरावर तालुका संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हास्तरीय खातेप्रमुखांनाही तालुक्यांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक पाटील यांनी दिली.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नागरिक तसेच सामाजिक संस्था, युवक मंडळे यांनी दि.१ रोजी सकाळी १० ते ११ या वेळेत आयोजित स्वच्छता उपक्रमांमध्ये सहभागी होऊन आपल्या गावाच्या स्वच्छतेसाठी योगदान द्यावे.

- आशिमा मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com