
नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik
अंबड औद्योगिक वसाहतीत डी झोन मध्ये असणाऱ्या एका चिगट टेप बनविणाऱ्या कंपनीत अचानक शॉर्टसर्किट झाल्याने लाखो रुपयांच्या कच्च्या मालासह सहा ते सात मशिनरी जळून खाक झाल्याची घटना रविवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. यावेळी तात्काळ अग्निशमन विभागाच्या दोन ते तीन बंबांनी घटनास्थळी धाव घेत चार ते पाच तासाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविले.
अंबड औद्योगिक वसाहतीत पावर हाऊस मागील परिसरात डी ४९ समोरील साई इंटरप्राईजेस नावाची सुरज कोठावदे यांच्या मालकीच्या कंपनीत विविध प्रकारचे चिगट टेप बनविले जातात. रविवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास अचानक शॉर्टसर्किट झाल्याने कंपनीत मोठ्या प्रमाणात आग लागली.
आग लागल्याची माहिती समजतात अंबड व नवीन नाशिक येथील दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. तब्बल तीन ते चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन विभागाला यश आले.
दरम्यान, यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरीही आठ ते दहा लाखांचा कच्चा माल व सहा ते सात प्रकारच्या मशनरी जळून खाक झाल्याने या आगीत २५ ते ३० लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.