सजवलेल्या सर्जा-राजाची मिरवणूक; पावसाने शेतकरी सुखावले

सजवलेल्या सर्जा-राजाची मिरवणूक; पावसाने शेतकरी सुखावले

मालेगाव | प्रतिनिधी | Malegoan

गत दीड वर्षापासून करोना संकटाने (Corona) आर्थिक चक्र विस्कळीत केले असले तरी यंदा उशीरा कां होईना पर्जन्यवृष्टी होत आहे. यामुळे बळीराजाने कुटूंबातील सदस्यच असलेल्या लाडक्या सर्जा-राजाचा बैलपोळा सण (Bailpola Festival) उत्साहात साजरा केला....

सायंकाळी श्रृंगारलेल्या सर्जा-राजाची मिरवणूक काढण्यात येवून हनुमान मंदिरासमोर नतमस्तक केले गेले.

गत तीन दिवसांपासून शहरासह तालुक्यात सुरू असलेल्या पावसाने (Rain) काहीशी उघडकीप घेतल्याने सर्जा-राजाच्या श्रृंगाराचे साहित्य खरेदीसाठी बाजारात शेतकर्‍यांनी एकच गर्दी केली होती.

सरदार चौक, गुळबाजार, सटाणानाका, संगमेश्वर, कॅम्प, रावळगावनाका आदी भागात श्रृंगार विक्रीची दुकाने थाटण्यात आली होती. बाशींग, झुल, नाथा, मोरक्या, गोंडे, गेरा, दोर, घुंगरू, पट्टा, गेरकडी, कवडी व घुंगरांच्या माळा, वेसन, कासरा, शिंगांसाठी बेगड, विविध रंगांचे गेरू आदी साहित्य मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आले.

करोनामुळे वस्तूंच्या किंमती वाढल्या असल्या तरी वर्षभर काबाड कष्ट करणार्‍या अन्नदाता सर्जा-राजाचा सण साजरा करण्यासाठी शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात श्रृंगाराच्या साहित्याची खरेदी केल्याने दुकानदारांमध्ये देखील समाधानाचे वातावरण दिसून आले.

बाजारपेठेत शांतता असल्याने चिंता वाढली होती. मात्र अखेरच्या दोन-तीन दिवसात शेतकर्‍यांनी (Farmers) खरेदीसाठी गर्दी केली होती. गत वर्षापेक्षा यंदा बैलपोळ्याच्या साहित्याची चांगली विक्री झाल्याचे दुकानदारांनी सांगितले.

बळीराजासाठी दिवाळी सणाइतकेच (Diwali Festival) महत्व असलेल्या बैलपोळा सणाचा आज शहरासह तालुक्यात मोठा उत्साह दिसून आला. सकाळपासूनच गिरणा-मोसम नदींवर बैलांना धुण्यासाठी शेतकरी बांधवांची उपस्थिती लक्ष वेधून घेणारी ठरत होती.

डोक्याला बाशींग बांधण्यात येवून गळ्यात कवड्या व घुंगरांच्या माळा घालण्यात आल्या. नवी वेसन व कासरा लावण्यात आली तर पाठीवर नक्षीदार झुल घालत सर्जा-राजाचा श्रृंगार करण्यात आला होता.

करोनाचे सावट असले तरी कुटूंबाचा घटक म्हणून समजला जाणारा तसेच वर्षभर काबाडकष्ट करून मदत करणार्‍या सर्जा-राजाचा बैलपोळा साजरा करत शेतकर्‍यांतर्फे कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. श्रृंगारलेल्या सर्जा-राजांना भगवान हनुमानाचे दर्शनासाठी नेण्यात आले. यावेळी ठिकठिकाणी महिलांतर्फे बैलांचे पुजन करण्यात येवून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य खावू घालण्यात आला.

करोना उद्रेक तसेच विक्रमी उत्पादनामुळे भाजीपाल्यासह शेतमालास अपेक्षित असा भाव मिळत नसल्याने शेतकरी बांधव अक्षरश: हवालदिल झाले आहेत. टमाटे, कारलेसारखे नगदी पिक तर उकीरड्यावर फेकण्याची वेळ अनेक शेतकर्‍यांवर आली आहे.

अनेक बाजार समित्यांचे कामकाज जवळपास अद्याप पाहिजे तसे सुरू झालेले नाही. त्यामुळे शेतमाल आहे त्या किंमतीत विकावा लागत आहे. भरवशाच्या कांद्याने देखील साथ न दिल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडलेले आहेत, अशी बिकट परिस्थिती असली तरी पावसाने मात्र उशीरा का होईना भरभरून कृपादृष्टी केल्याने खरीप हंगाम मोठ्या जोमात आहे.

मका, बाजरी, भुईमूग, सोयाबीन आदी पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी करण्यात आली आहे. आर्थिक विवंचना दूर करण्यास हातभार लावणार्‍या मक्यास पसंती दिली आहे.

चांगल्या पावसामुळे खरीपापाठोपाठ रब्बी हंगामाच्या देखील आशा पल्लवीत झाल्या असल्याने उल्हासित झालेल्या शेतकर्‍यांनी मोठ्या उत्साहात बैलपोळा सण साजरा केला. तालुक्यात गावागावात सायंकाळी श्रृंगारलेल्या बैलांच्या मिरवणुका मोठ्या उत्साहात शेतकरी बांधवांतर्फे काढण्यात आल्या होत्या.

शेतकरी कुटूंबातील महत्वाचा घटक असलेल्या अन्नदाता सर्जा-राजाचा बैलपोळ्याचा दिवस अत्यंत शुभ आहे. बैलपोळ्यानिमित्त सर्व शेतकरी बांधवांना व जनतेस आपल्या शुभेच्छा. यांत्रिकी युग आले असले तरी कष्टकरी बैलांचे महत्व कमी झालेले नाही.

यंदा चांगला पाऊस झाला असल्याने सर्वत्र समाधानाचे वातावरण पसरले आहे. पशुधन वाढावे या दृष्टीकोनातून विशेष प्रयत्न होण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया कृषिमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी व्यक्त केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com