
नाशिक । प्रतिनिधी Nashik
आगामी गणेशोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर आज पोलीस आयुक्तालयात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आगामी गणेशोत्सव शांततेत साजरा व्हावा, त्याला कोठेही गालबोट लागू नये, यासाठी शहरातील सर्व गणेश मंडळांंनी मंडप उभारणीदरम्यान कोणालाही त्रास होणार नाही व वाहतुकीला अडथळा होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी, असे आवाहन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी केले.
आ. देवयानी फरांदे, जिल्हा गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष समीर शेटे यांच्यासह शहरातील विविध कार्यालयांकडील मनपा विभाग, विद्युत वितरण विभाग, नाशिक ट्रान्सपोर्ट, कर विभाग, जलतरण विभाग, मनपा विभागीय कार्यालय, जिल्हा रुग्णालय, आरटीओ कार्यालय, कॅन्टोन्मेंट बोर्ड, दूरसंचार विभाग, एमएसईबी, एस.टी. महामंडळ, उत्पादन शुल्क विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, समादेशक होमगार्ड, नागरी संरक्षण दल, बांधकाम विभाग, अग्निशमन, प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हा माहिती व प्रसिद्धी अधिकारी इत्यादी शासकीय कार्यालयांकडील प्रशासकीय अधिकारी, शहरातील गणेश मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते.
शासनाच्या विविध विभागांवर असलेल्या जबाबदारीचे पालन करून गणेशोत्सव शांततेने साजरा करण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन मध्य नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे यांनी केले. सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या नियमावलीचे पालन करून बक्षीस मिळवण्यासाठीचे आवाहनही आयुक्तांनी केले. दि. 19 ते 28 सप्टेंबरदरम्यान गणेशोत्सव साजरा होत आहे.
गणेशोत्सव सौहार्दपूर्ण व खेळीमेळीच्या वातावरणात साजरा व्हावा, नागरिकांना उत्सवात उत्स्फूर्तपणे सहभाग घेता यावा व शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरता भीष्मराज बाम हॉल, पोलीस मुख्यालय, नाशिक शहर येथे विविध विभागांतील प्रशासकीय अधिकारी, राजकीय पदाधिकारी, गणेश मंडळांचे पदाधिकारी तसेच शांतता समिती सदस्य यांची बैठक आयोजित करण्यात आली. पोलीस उपायुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव यांनी प्रास्ताविक केले. सहाय्यक पोलीस आयुक्त अंबादास भुसारे यांनी आभार मानले.
मंडळांसाठी सूचना
मंडळात स्थापन करण्यात आलेल्या गणेशमूर्ती व परिधान करण्यात येणार्या दागिन्यांच्या सुरक्षेसाठी स्वयंसेवक तसेच सुरक्षारक्षकाची नेमणूक करण्यात यावी. उत्सवादरम्यान करण्यात येणारी सजावट व दाखवण्यात येणारी चित्रफित यामुळे कोणाच्याही धार्मिक भावना दुखावणार नाहीत, याची विशेष काळजी घेण्यात यावी, गणेशमूर्ती स्थापना करताना शहरातील विविध कार्यालयांनी ठरवून दिलेल्या अटी शर्तीचे तंतोतंत पालन करण्यात यावे.
मंडळांच्या मागण्या
बैठकीत गणेश मंडळांच्या पदाधिकारी व शांतता समिती सदस्य यांनी उत्सवादरम्यान तसेच गणेश विसर्जनादरम्यान येणार्या अडचणी सांगून मिरवणूक मार्गावरील इलेक्ट्रिक तारा काढण्यात याव्यात, मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण काढून एक खिडकी योजना सुरू करण्यात यावी, नोंदणीकृत मंडळाला बंदोबस्त मिळावा, रस्त्यावर पडलेले पाईप बाजूला करण्यात यावे, रात्रीच्या वेळी टवाळखोरांचा बंदोबस्त व्हावा इत्यादी मागण्या केल्या.