
नाशिकरोड | दिगंबर शहाणे | Nashikroad
सावकाराच्या जाचाला कंटाळून येथील जय भवानी रोड परिसरात राहणाऱ्या दोघा भावांनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यापैकी एका भावाचा मृत्यू झाल्याने नाशिकरोड परिसरात खळबळ उडाली होती....
या घटनेनंतर मृत्यू झालेल्या युवकाच्या युवकाच्या नातेवाईकांनी व मित्रांनी रास्ता रोको करून संबंधित सावकाराला अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. या मागणीनंतर उपनगर पोलिसांनी संबंधित सावकारावर गुन्हा दाखल केला असून लवकरच त्याला अटक करण्यात येणार असल्याची माहिती उपनगर पोलिसांनी दिली.
रवींद्र लक्ष्मण कांबळे व जगन्नाथ लक्ष्मण कांबळे या दोघ्या सख्या भावाने सावकाराच्या जाचाला कंटाळून विष प्राशन केले होते. त्यानंतर हे दोघेही एकलहरे येथील डोंगराजवळ बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
परंतु उपचारादरम्यान रविंद्र कांबळे याचा मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त झालेल्या त्याच्या नातेवाईकांनी व मित्र परिवारांनी नाशिक पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करून संबंधित सावकारावर त्वरित गुन्हा दाखल करून अटक करावी अशी मागणी केली. तरच आम्ही मृतदेह ताब्यात घेऊ, अशी भूमिका घेतली.
परिणामी या प्रकाराचे उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर यांनी गंभीर दखल घेतली व संबंधित सावकारा विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर जमाव शांत झाला.
या प्रकरणी रघुनाथ कांबळे यांनी उपनगर पोलीस ठाण्यात संबंधित सावकारा विरुद्ध तक्रार दाखल केली. कांबळे यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी रत्नाकर भोर (रा. जगताप मळा, नाशिक रोड) याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून भोर याचा पोलीस शोध घेत आहे.