
निफाड | प्रतिनिधी | Niphad
विविध खातेदारांच्या खोट्या सह्या करून तब्बल ३४ लाख रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार सायखेडा (Saikheda) येथे घडला. याप्रकरणी सायखेडा पोलीस ठाण्यात (Saikheda Police Station) पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी लिपिकावर (Clerk) गुन्हा दाखल करण्यात आला आहे...
याबाबत माहिती अशी की, सायखेडा विविध कार्यकारी सहकारी सोसायटीत कार्यरत असलेल्या संशयित संतोष माधव घुगे (रा. सायखेडा) याने लिपिक पदाचा गैरवापर करून व खातेदार, कर्मचारी व संचालकांच्या खोट्या सह्या करून १८ जानेवारी २०१४ ते २७ आॅक्टोबर २०२० या कालावधीत सायखेडा विविध कार्यकारी सहकारी सोसायटीत ३४ लाख ३६ हजार ८७३ रुपयांचा अपहार केला.
याबाबत नाशिक सहकारी संस्थेचे लेखापरिक्षक अनिलकुमार पांडुरंग गुंजाळ (रा. सहकारी संस्था, प्लाॅट नंबर १०, गणेशनगर, जेलरोड, नाशिक) यांनी सायखेडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, अपहारासंदर्भातील सर्व कागदपत्रे सादर केली आहे.
याप्रकरणी संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. वाय कादरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय गायकवाड तपास करीत आहे.