
नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik
फ्लॅटवर पतसंस्थेचा बोजा असतांना देखील खरेदीदाराला त्याबद्दल माहिती न देता परस्पर फ्लॅटची विक्री करून त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने संशयतांवर अंबड पोलीस ठाण्यात (Ambad Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला...
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनेश रावसाहेब चव्हाण (४३, रा.फ्लॅट नंबर १०२, वावरे एम्पायर अपार्टमेंट, कामटवाडे, अंबड, नाशिक) यांनी अशोक विठ्ठल कोठावदे (५३), सुनीता अशोक कोठावदे (४५, दोघे रा. प्लॉट नंबर ३६ ब, गजानन नगर, काशीधरा रोड, साक्री, जि. धुळे) यांचा फ्लॅट २३ लाख ६० हजार रुपयांत विकत घेतला होता.
दरम्यान फ्लॅट विकत घेत असताना कोठावदे दाम्पत्याने चव्हाण यांना फ्लॅटवर कोणताही बोजा अथवा कर्ज नसल्याचे सांगितले होते मात्र फ्लॅट विक्री झाल्यानंतर चव्हाण यांनी नवीन सातबारा काढला असता त्यावर खरेदी तारखेनंतर २०२० सालात धुळे येथील एका पतसंस्थेमध्ये कर्ज बोजा दिसून आल्याने त्यांनी याप्रकरणी न्यायालयात धाव घेतली होती.
न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेत अंबड पोलिसांना (Ambad Police) सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. याप्रकरणी पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रकाश कातकडे करीत आहेत.