नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

सातत्याने वाढत असलेल्या डिझेल दरामुळे प्रवासी आणि माल वाहतूकदार आर्थिक संकटात सापडले आहेत. केंद्राने आतापर्यंत दोन वेळा इंधनावरील कर वाढवल्याने वाहतूकदारांपुढे अडचणी निर्माण झाल्या आहेत. लॉकडाऊनमुळे आधीच वाहतूकदारांचा व्यवसाय तोट्यात असल्याने इंधन दरवाढीमुळे वाहतूकदारांचा व्यवसाय अडचणीत सापडला आहे.

देशातील तेल कंपनीने आंतरराष्ट्रीयस्तरावर इंधनाचे दर कमी केले आहेत. मात्र, केंद्र सरकारने इंधनावर वाढवलेला अबकारी कर व राज्य सरकारने वाढवलेला व्हॅटमुळे देशातील वाहतूकदार आणि सर्वसामान्य नागरिकांना त्याचा कोणताही फायदा झाला नाही.

इंधनाचे दर गगनाला भिडले असून डिझेलच्या दरातही सातत्याने वाढ होत आहे. त्याचा वाहतूकदारांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे इंधनावरील अबकारी कराचे दोन वेळा वाढवलेले एकूण 31.83 रुपये प्रतिलिटर कराची रक्कम कमी करावी, अशी मागणी ऑल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्ट काँग्रेसच्या सदस्यांनी केली आहे. येत्या 15 दिवसांत मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

दरम्यान, इंधनावरील अबकारी कर कमी करण्याच्या मागणीसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना निवेदन पाठवण्यात आले आहे. येत्या 15 दिवसांमध्ये ही मागणी पूर्ण न झाल्यास वाहतूकदारांकडून देशपातळीवर आंदोलन केले जाईल, असे ऑल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्ट काँग्रेस, नवी दिल्लीच्या सदस्यांनी सांगितले आहे.