Gangapur Dam
Gangapur Dam
नाशिक

पाण्याचे सूक्ष्म नियोजन करा - पालकमंत्री भुजबळ

आढावा बैठकीत सूचना

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी Nashik

गतवर्षीच्या तुलनेत यंदा जून व जुलै महिन्यात पाऊस कमी झाल्यामुळे, सध्य परिस्थिती पाहता चिंतेचे वातावरण आहे. जिल्ह्यातील उपलब्ध धरणसाठा लक्षात घेऊन पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याच्या आरक्षणाचे सूक्ष्म नियोजन करण्यात यावे, अशा सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या.जिल्ह्यातील पाऊस, धरणसाठा, पीक परिस्थिती आणि जिल्ह्यातील अन्नधान्य पुरवठा आदी बाबींच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी, अधीक्षक अभियंता अलका अहिरराव, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, जिल्हा कृषी अधीक्षक संजय पडवळ, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर, जलसंपदा विभाग कार्यकारी अभियंता सागर शिंदे, कार्यकारी अभियंता राजेश गोवर्धने व संबधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी भुजबळ म्हणाले, जिल्ह्यात आजपर्यंतची पावसाची टक्केवारी ४७ टक्के असून धरणासाठा देखील समाधानकारक नाही. ही जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत चिंतेची बाब आहे. पाणी काटकसरीने वापरण्याबाबत जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका यांना योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात याव्यात असे त्यांनी उपस्थित अधिकार्‍यांना सांगितले.

जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंता अलका अहिरराव यांनी जिल्ह्यातील धरणातील उपलब्ध पाणी साठाबाबत माहिती दिली. गतवर्षीत तुलनेत हा उपलब्ध साठा फारच कमी असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ यांनी यावेळी कृषी विभागाचा आढावा सादर केला. जिल्ह्याच्या पूर्व भागात समाधानकाराक पाऊस झाला असून जिल्ह्यात भात पेरणी वगळता सर्व पेरण्या समाधानकारक झालेल्या आहेत. जिल्ह्यात खतांचा मुबलक साठा असून यात युरियाचा १०८ टक्के अधिकचा साठा उपलब्ध असल्याचे सांगितले.

जिल्ह्यातील पुरवठा विषयक माहिती देताना जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर यांनी जिल्ह्यात सध्या ३५ हजार मॅट्रिक टन धान्य साठवणूक क्षमता आहे. यामध्ये कोव्हीड कालखंडात १४ हजार मॅट्रिक टन साठवणूक क्षमता वाढवली आहे. जिल्ह्यात आणखी २५ हजार मॅट्रिक टन धान्य पुरवठ्याची क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती दिली.

Deshdoot
www.deshdoot.com