पल्स पोलिओ मोहिमेचे सूक्ष्म नियोजन करावे : जिल्हाधिकारी मांढरे

पल्स पोलिओ मोहिमेचे सूक्ष्म नियोजन करावे : जिल्हाधिकारी मांढरे

नाशिक । प्रतिनिधी Nashik

करोनाच्या corona पार्श्वभूमीवर 23 जानेवारी रोजी होणार्‍या राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचे Pulse Polio Campaign सूक्ष्म नियोजन करण्याव यावे. तसेच तिसर्‍या लाटेचा धोका लक्षात घेता आवश्यक त्या सर्व दक्षता घेऊन पल्स पोलिओ मोहीम यशस्वीपणे पार पडेल यासाठी संबंधित यंत्रणांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे, अशा सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे District Collector Suraj Mandhare यांनी दिल्या आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी सूरज मांढरे बोलत होते. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, महापालिकेच्या लसीकरण नोडल अधिकारी डॉ. अजिता सांळुखे, मालेगाव महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सपना ठाकरे, जिल्हा परिषदेचे जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. कैलास भोये, सर्व्हेलन्स मेडिकल ऑफिसर डॉ. प्रकाश नांदापूरकर उपस्थित होते.

येत्या 23 जानेवारी रोजी पल्स पोलिओ मोहीम राबवण्याबाबत नियोजन करण्यात येत आहे. परंतु नाशिक जिल्ह्यातील करोनाची वाढती रुग्णसंख्या विचारात घेऊन मोहिमेच्या वेळापत्रकात बदल करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाला पाठवण्यात यावा. तसेच तालुकापातळीवर सर्व तालुका वैद्यकीय अधिकार्‍यांनी एएफपी रुग्णांची नियमित तपासणी करून टूल सॅम्पल तपासणीसाठी पुढे पाठवावेत, अशा सूचनाही यावेळी मांढरे यांनी दिल्या आहेत.

मालेगाव शहरात मुस्लीम बांधवांच्या मनात लसीकरणाविषयी गैरसमज आहेत. पल्स पोलिओ मोहीम राबवतानाही ही समस्या उद्भवली होती. परंतु जनजागृती व विविध उपक्रमांच्या माध्यमातून आपण पोलिओ लसीरकरण मोहीम यशस्वी केली. त्याचप्रकारे करोना लसीकरणाबाबतही मालेगाव शहरात विशेष प्रयत्न करावे, असेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रात 2010 मध्ये मालेगाव शहरात चार व बीड जिल्ह्यात एक असे एकूण पाच पोलिओ रुग्ण आढळले होते. संपूर्ण देशात 13 जानेवारी 2011 नंतर आजपर्यंत एकही पोलिओचा रुग्ण आढळून आला नाही, हे आजवर सातत्यपूर्ण राबवल्या गेलेल्या पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे यश आहे. यामुळेच देशाला 2014 रोजी ‘पोलिओ फ्री’चे प्रमाणपत्रही देण्यात आले असल्याची माहिती सर्व्हेलन्स मेडिकल ऑफिसर डॉ. प्रकाश नांदापूरकर यांनी दिली.

23 जानेवारी रोजी राबवण्यात येणार्‍या राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेत नाशिक जिल्ह्यात एकूण 8 लाख 38 हजार 687 बालकांना डोस देण्यात येणार आहे. यासाठी 8,387 बूथची व्यवस्था करण्यात आली असून यासाठी 16,774 कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे, अशी माहिती डॉ. भोये यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com