
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागाच्या लाचखोर शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांचा प्रवास अनुकंपा नोकरीपासून सुरु झाला अन् निवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईने त्यांचा प्रवास संपन्न होत आहे...
सुनीता धनगर या मूळच्या सटाण्याच्या. त्यांचे सर्व शिक्षण सटाणामध्ये झाले. चतुर्भुज झाल्याने सटाण्याला त्यांनी राम राम केला व त्या ठाणे येथे स्थायिक झाल्या. त्यांनी तेथे बीएडची पदवी संपादित केली. नवीन संसाराचा मांडलेला डाव फुलण्या अगोदरच मिटला गेला. त्यांच्या पतीचे अकाली निधन झाले. सोबत लहान मुलगा होता. पती शासकीय नोकरीत असल्याने त्यांना अनुकंपाखाली नोकरी मिळाली. जिल्हा परिषदेच्या ठाणे येथील शाळेत त्या शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. सोबत लहान बाळ असल्याने नोकरी व बाळाचे पालनपोषण करणे जिकरीचे होऊ लागले. त्यामुळे त्यांनी आपल्या मूळ जिल्ह्यात बदली घेतली.
नाशिकच्या शासकीय कन्या विद्यालयात त्या शिक्षिका झाल्या. एमएची पदवी संपादित केली. 1994 ते 2010 या प्रदिर्घ कालावधीत त्या इयत्ता 10 वीला इंग्रजी विषय शिकवित असत. त्यांनी स्पर्धा परीक्षा देण्यास सुरुवात केली. सरळ सेवेने त्या विस्तार अधिकारी झाल्या. कालांतराने उपशिक्षणाधिकारी म्हणून त्यांना बढती मिळाली. त्या चांदवड येथे विस्तार अधिकारी, नाशिक जिल्हा परिषद उपशिक्षणाधिकारी तर देवळा येथे गटशिक्षणाधिकारी होत्या.
दोन वर्षापासून त्या नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षणाधिकारी म्हणून काम करत असताना त्यांना लाचखोरीची लागन झाली. घरात 85 लाखांची रोकड, 32 तोळे सोने पडलेले असताना 50 हजारांची हाव सुटली नाही व त्यातूनच त्यांच्या कारकिर्दीला घरघर लागली. गेल्या महिन्यात अनुकंपावर नियुक्तीपत्र देत असताना पालकमंत्री दादा भुसे यांनी अनुकंपाधारकांना प्रामाणिक जनसेवेची शपथ दिली होती. त्यांनी तरी किमान जनतेप्रति प्रामाणिक असावे, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र सुनीता धनगरांनी त्या अपेक्षेवरही पाणी फिरविले आहे.