विहिरीत कार कोसळल्याने एकाच कुटूंबातील चार जणांचा मृत्यू

सटाण्यातील बोडके कुटुंबावर काळाचा घाला
विहिरीत कार कोसळल्याने एकाच कुटूंबातील चार जणांचा मृत्यू

साक्री । प्रतिनिधी

तालुक्यातील दिघावे फाट्या शेजारील विहिरीत कार कोसळल्याने एकाच कुटूंबातील चार जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर चालक कुटूंब प्रमुखाचे प्राण वाचविण्यास यश आले.

सटाणा येथील रहिवाशी शंकर यादवराव बोडके हे स्वतःच्या कारने (क्र.एम.एच.02-1740) बळसाने (दुसाने)ता. साक्री येथून लग्नानिमित्ताने दुपारी दिघावे ता.साक्री येथे जात होते. त्यांचा वाहनावरील ताबा सुटल्याने कार दिघावे फाट्यावरील कासारेतील शेतमालक मिलिंद जयवंतराव देसले यांच्या विहिरीत कोसळली. शंकर बोडके (रा. सटाणा) हे सुखरूप बाहेर पडले. परंतु त्यांची पत्नी गौरी बोडके(वय.35), मुलगी श्रद्धा बोडके(वय.15), मुलगा तन्मय बोडके (वय.12) व दिघावे येथील नातेवाईक मुलगी भूमिका योगेश पानपाटील (वय.12) यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

कासारे येथे घटना कळताच सरपंच विशाल देसले, पोलीस पाटील दिपक काकूस्ते, मनसेचे धिरज देसले, ग्रामपंचायत सदस्य बाळा खैरनार, जितेंद्र देसले यांसह असंख्य तरुण तात्काळ मदतीसाठी धावले. मदतकार्यासाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध करुण काही मिनिटात मदतकार्य केल्यामुळे शंकर बोडके यांना वाचविण्यात त्यांना यश आले. इतर कुटुंबीय मात्र मृत झाले.

कारचालक शंकर बोडके इतके घाबरले होते की त्यांना एक तासभर काहीच सुचले नाही. साक्री पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्याने विहिरीतून तरुणांच्या मदतीने कार बाहेर काढली.घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, ए.पी.आय. बनसोडे यांनी भेट दिली. सायंकाळी उशिरापर्यंत घटनास्थळी पंचनामा सुरु होता. विहिरीतून रात्री उशिरापर्यंत मृतदेह बाहेर काढण्याचे काम चालू होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com