कॅन्टोमेन्ट कर्मचाऱ्यांना तीन महिन्यापासून 'ना वेतन ना पेन्शन'

आठवड्यात प्रश्न मार्गी लागणार : खा.गोडसे
कॅन्टोमेन्ट कर्मचाऱ्यांना तीन महिन्यापासून 'ना वेतन ना पेन्शन'

देवळाली कॅम्प | Deolali Camp

येथील कॅन्टोन्मेंट बोर्डाचे कर्मचारी व पेन्शनधारक गेल्या तीन महिन्यापासून ना वेतन ना पेन्शन त्यामुळे हतबल झाल्याने त्यांनी थेट खासदार हेमंत गोडसे यांच्याकडे धाव घेत व्यथा मांडली.

खा. गोडसे यांनी वरिष्ठ अधिकारी यांचेशी दूरध्वनी वरून चर्चा केली असता आठवड्यात हा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे सांगण्यात आले.

कॅन्टोमेन्ट कामगार युनियनचे अध्यक्ष एम.आय. खान यांचे नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने खासदार गोडसे यांची निवासस्थानी भेट घेऊन व्यथा मांडली असता त्यात सेवानिवृत्त कर्मचारी वर्गाचे सेवानिवृत्त वेतन गेल्या वर्षभरात वेळेवर होत नाही.

सध्या मार्च, एप्रिलचे वेतन मिळालेले नाही, जेव्हा युनियन पदाधिकारी याबाबत सीईओ यांची भेटी घेतात तेव्हा वेळकाढूपणा केला जातो. या महिन्यात दोन वेळा युनियन पदाधिकारी यांनी भेट घेतली असता कोविडचे कारण सांगण्यात आले.

याबाबत डिजी (दिल्ली) व सिडीए (पुणे) या कार्यालयाशी संपर्क साधला असता निधी पाठविला असल्याचे सांगितले जाते. मग कर्मचारी व पेन्शनधारक यांना त्रास का? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

कोविड काळात सरकारने १५ टक्के कर्मचारी कामावर बोलविले आहेत. दिल्ली व पुणे येथील कार्यालय निधी उपलब्ध करून देत असताना देवळालीला अद्याप पर्यंत का मिळाला नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पगार नसल्याने कर्मचारी वर्गाचे हाल होत आहे. त्यांनी विविध प्रकारचे घेतलेल्या कर्जाचे हप्ते थकीत होऊन व्याजाचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यातच घर, गाडी यांचे व्याज दुप्पट होऊन अधिकचा फटका बसत आहे.

यावेळी खासदार गोडसे यांनी दिल्ली येथील सहाय्यक डायरेक्टर जनरल सोनम यांगडाल व मुंबई येथील डिफेन्स इस्टेट ऑफिसर राहुल आंनद यांचेशी दूरध्वनी वरून संपर्क साधला असता, देवळाली कॅन्टोमेन्टसाठी एक महिन्यांपूर्वीच १० कोटी रुपये वेतनासाठी मंजूर करण्यात आले असल्याचे सांगितले.

प्रशासकीय पूर्तता करणे गरजेचे आहे, याबाबी देवळाली कॅन्टोमेन्ट प्रशासन यांनी तातडीने पूर्ण केल्यास आठवड्यात हा प्रश्न मार्गी लागेल. खा.गोडसे यांनी कामगारांना वेतनाचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे सांगितल्याने कामगारांना मोठा दिलासा मिळाला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com