देवळाली कॅम्प । प्रतिनिधी Devlali Camp

येथील कॅन्टोमेन्ट कर्मचारी, सेवनिवृत्त व ठेकेदार मजुरांना गेल्या दोन महिन्यापासून वेतन मिळत नसल्याने हतबल झालेल्या कर्मचार्यांनी खा. हेमंत गोडसे यांना हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी साकडे घातले आहे. दरम्यान खा.गोडसे यांनी लष्करी वरीष्ठ अधिकार्यांशी संपर्क साधला असता लवकरच यातून मार्ग काढू असे आश्वासन देण्यात आले.

कोविड काळात देशातील अर्थव्यवस्था कमकुवत झाली असल्याने सरकारी आस्थपना देखील हतबल झाल्या आहेत, संरक्षण खात्यांतर्गत असलेल्या कॅन्टोमेन्ट बोर्डाचे विविध प्रकारचे देयके अद्याप प्राप्त झालेले नसल्याने देवळाली कॅन्टोमेन्ट बोर्डात मोठा आर्थिक तुटवडा निर्माण झाला आहे.

जीएसटीसह विविध प्रकारचे सेवा कर येणे बाकी आहे. स्थानिक लष्करी आस्थपनाकडून सुमारे 90 कोटी सेवा कर तर केंद्र सरकारकडून जीएसटीचे सुमारे 35 कोटी व राज्य सरकारकडून सुमारे 5 कोटी रुपये येणे बाकी आहेत. त्यामुळे उपरोक्त सेवकांना गेल्या दोन महिन्यापासून विना वेतन काम करावे लागत आहे.

याबाबत पेन्शनर असोसिएशनचे अध्यक्ष एम.आय. खान, केशव बोराडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने खा.गोडसे यांची भेट घेऊन मार्ग काढण्यासाठी विनंती केली असता खा.गोडसे यांनी संरक्षण विभागाचे डायरेक्टर जनरल दीपा बाजवा, सदन कमांड पुणेचे प्रिन्सिपल डायरेक्टर अजयकुमार शर्मा यांचेशी फोनवरून संपर्क साधला असता, सद्यस्थितीत देशात आर्थिक संकट आहे.

तरीही देवळाली कॅन्टोमेन्टच्या देय असलेल्या रकमेबाबत सकारात्मक विचार करून लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले. यावेळी संजीव राजीरा, शिवाजी सपकाळे, राजू काळे, संजय निकम, दीपक पारचा, सुरेंद्र महेरोलीया, कमल किशोर, चित्रा सोनवणे, विलास चांदणे, रोहिदास अहिरे, प्रकाश लाधुराम आदी उपस्थित होते.