पंचाळे । वार्ताहर Sinnar / Panchale

ग्रामपंचायत सदस्य निवडीसाठी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर उमदेवार व समर्थक मतदानाच्या आकडेवारीचे गणित जुळविण्यात मग्न झाले असल्याचे चित्र बघायला मिळाले.

मतदार यादी समोर ठेऊन आपणास कोणत्या कुटुंबातील कोणती मते मिळाली याबाबत चिकित्सा सुरू झाली आहे. मतदानासाठी होणारी धावपळ थांबली असली तरी आकडेमोडीमध्ये उमेदवारांचा दिवस जात आहे. निवडणुकीचा निकाल 18 जानेवारी रोजी असला तरी विक्रमी झालेले मतदानाची आकडेवारी पाहता प्रत्येक उमेदवाराने विजयाबाबत धसका घेतला आहे.

कारण कमी मतदानात विजयी होणे सोपे असते. परंतु ज्यादा मतदान हे तोडीस तोड चालते. त्यामुळे प्रतिस्पर्धी उमेदवाराची तुलना मतमोजणी आकडेवारीत केले जात आहे. त्यामुळे सध्या उमेदवारांना दोन दिवस चिंता असून यावर 18 तारखेला उपाय होणार आहे.

आकडेवारीत मग्न झालेल्या उमेदवारांनी सध्या निवडणुकीसाठी झालेल्या खर्चाचा हिशोब न करता मतदानाचा हिशोब करण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. उमेदवारांच्या घरी अथवा मळ्यामध्ये ठराविक लोकांना बोलावून मतदानाबाबत चर्चा केली जात आहे. मतदारही उमेदवार नाराज होऊ नये म्हणून उमेदवारास शाब्दीक उभारी व आधार देण्याचे काम करत आहे.