बुद्धपौर्णिमेला होणारी वन्यप्राणी गणना रद्द

३१ मेपर्यंत अभयारण्यांमध्ये प्रवेशबंदी: वन्यजीव विभागाचा निर्णय
बुद्धपौर्णिमेला होणारी वन्यप्राणी गणना रद्द

नाशिक | Nashik

करोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन लॉकडाऊन लागू असल्याने ३१ मेपर्यंत अभयारण्यासह राखीव वनक्षेत्रात पर्यटकांना प्रवेशबंदी कायम राहणार आहे.

त्यामुळे बुद्धपौर्णिमेच्या चांदण्यारात्री लख्ख प्रकाशात अभयारण्ये, राखीव वनक्षेत्रांच्या परिसरात करण्यात येणारी वन्यप्राणी गणना रद्द करण्याचा निर्णय राज्य वन्यजीव विभागाने घेतला आहे. वन्यप्राणी गणना रद्दचे आदेश वरिष्ठ कार्यालयाकडून स्थानिक अधिकाऱ्यांना प्राप्त झाले आहे.

दरवर्षी राज्यभरात बुद्धपौर्णिमेला वार्षिक वन्यप्राणी गणना वन्यजीव विभागासह वनविभागाकडून (प्रादेशिक) केली जाते. वन्यप्राणी गणनेदरम्यान एका मचाणावर एकापेक्षा अधिक निसर्गप्रेमी, वन्यजीवप्रेमींची संख्या असते.

मात्र, गेल्या सव्वा वर्षापासून कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याने सोशल डिस्टन्सिंगसह इतर नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. तसेच सध्या संचारबंदी लागू असल्याने अभयारण्यांमध्ये निसर्गप्रेमी, वन्यजीवप्रेमी, पर्यावरणप्रेमी, अभ्यासकांना पोहोचण्यात अडचणी येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर वन्यप्राणी गणना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गेल्या वर्षीही नाशिक वनवृत्तातील नांदूरमध्यमेश्वरसह ममदापूर-राजापूर, कळसूबाई-हरिश्चंद्रगड, भंडारदरा, राजूर, यावल, आनेर, पाल आणि जामन्या या अभयारण्यात प्रगणना झाली नव्हती. त्यामुळे यंदाची प्रगणना वन्यप्राण्यांच्या संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात होती. प्रगणनेअभावी नाशिक वनवृत्तातील वन्यजीवांच्या संख्येचा तसेच संवर्धनाचा अहवाल रखडला आहे. अहवालासाठी थेट पुढील वर्ष उजाडणार आहे.

दरम्यान, दोन वर्षांपूर्वीच्या प्रगणनेत अवघे शेकरू आढळून आले होते. करोना नियमांचे पालन करून राजूरसह इतर क्षेत्रात मेअखेरीस शेकरूंची गणना करण्याचे नियोजन असल्याचे वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी सांगितले. तसे झाल्यास नाशिक परिक्षेत्रातील शेकरूंची संख्या समजू शकणार आहे.

सलग दुसऱ्या वर्षी प्रगणना होणार नसल्याने वन्यप्राण्यांच्या संवर्धन आराखड्यावर परिणाम होण्याची चिन्हे आहेत. भविष्यात कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन प्रगणनेचा निर्णय होईल.

- अनिल अंजनकर, वनसंरक्षक, नाशिक (वन्यजीव)

बुद्धपौर्णिमेच्या प्रगणनेचे महत्त्व

बुद्धपौर्णिमेला चांदण्या रात्रीचा प्रकाश हा अन्य पौर्णिमेच्या रात्रींपेक्षा अधिक प्रखर असतो. नैसर्गिक प्रकाश असल्यामुळे वन्यजीवदेखील फारसे घाबरत नाही. रात्रीच्या सुमारास पाणस्थळे, अभयारण्यांमधील पाणवठ्यांवर तृष्णा भागविण्यासाठी येणारे वन्यप्राणी सहज टिपता येणे शक्य होते. वन्यजीव रात्रीतून पाणवठ्यांजवळ किंवा निरीक्षण मनोरे अथवा मचाणाजवळून मार्गस्थ होत असल्याने त्यांची नोंद घेणे शक्य होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com