
म्हेळुस्के | Mheluske
म्हेळुस्के (ता. दिंडोरी) येथे पहाटेच्या सुमारास शिंदे वस्ती येथे दबा धरून बसलेल्या बिबट्याने (Leopard) वासरावर हल्ला (Attack) केल्याने या हल्ल्यात वासरू ठार झाले...
म्हेळुस्के येथील शेतकरी बाळासाहेब वामन शिंदे हे आपल्या स्वमालकीच्या शेतात (गट नं.5) कुटुंबियांसह वास्तव्यास असून शेतीला जोडधंदा म्हणून पशुधनदेखील सांभाळतात. आज पहाटेच्या सुमारास अचानक बिबट्याने गोठ्यात बांधलेल्या वासरावर हल्ला केल्याने वासरू ठार झाले.
या हल्ल्यात बिबट्याने वासराचा फडशा पाडल्याने फक्त हाडांचा सांगाडा शिल्लक राहिला आहे. भरवस्तीवर येऊन बिबट्या वारंवार शेतकर्यांच्या पशुधनाची हानी करत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून याबाबत नागरिक व पशुधन यांच्या सुरक्षेसंबंधी कुठलीही ठोस उपाययोजना संबंधित विभाग व प्रशासनाकडून होत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाने तत्काळ पिंजरा उपलब्ध करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. याप्रसंगी पशू शल्यचिकित्सक डॉ. भोये, वनविभाग कर्मचारी गोरख गांगोडे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. सदर घटनेचा पंचनामा वनविभागाकडे पाठवून बिबट्याच्या बंदोबस्तासाठी तत्काळ उपाययोजना करणार असल्याचे सांगितले.