
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
मल्टी सर्व्हीस ऑपरेटर (एम एस ओ) यांनी शनिवार दि.१८ सकाळी ११ वाजेपासून स्टार, झी व सोनी यांचे प्रक्षेपण कुठलीही पूर्वसूचना न देता बंद केले आहे. परिणामी ग्राहकांचा आम्हा केबल ऑपरेटर यांना रोष पत्करावा लागत आहे. याबाबत योग्य तो निर्णय घेऊन आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी करत आमच्या जीवितास धोका असल्याचे केबल ऑपरेटर्स असोसिएशनने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे...
असोसिएशनचे अध्यक्ष नितीन आव्हाड, सेक्रेटरी विनय टाकसाळे, संजय गुजरानी, माजी अध्यक्ष नूर भाई, मनीष म्हात्रे, बबन घोडे आदी यावेळी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, आम्ही केबल टी. व्ही. ग्राहकांना मल्टी सर्व्हिस ऑपरेटर (एम एस ओ) कडून सेवा घेऊन ती सेवा केबल ग्राहकांपर्यंत पुरवित आहोत. गेल्या ३० वर्षांपासून आम्ही या व्यवसायात आहोत. केबल टी. व्ही. अॅक्ट १९९५ अमेन्टमेंट २०१७ अनुसार नवीन नियम सेटअप बॉक्सचे लागू झाले आहे, त्याचे पालन करीत आहोत.
शनिवार सकाळी ११ वा. पासून एमएसओने स्टार, झी व सोनी या चॅनल्सचे बुके व एक चैनल किंमती आधारावर प्रक्षेपण बंद केले आहे.याबाबत कुठलीही पूर्व सुचना किंवा नोटीस दिलेली नाही. केबल टी. व्ही. कायदयाप्रमाणे पंधरा दिवसांची नोटीस व ग्राहकांसाठी स्थानिक वर्तमानपत्रात जाहिरात दिलेली नाही.
परिणामी आम्ही केबल ऑपरेटर ग्राहकांच्या रोशाला बळी पडत असून आमच्या जिवीताची हानी होऊ शकते. याची नोंद घ्यावी. तसेच महिन्याचे पैसे आगाऊ ग्राहकांकडून घेतले आहे व ते आम्ही एमएसओला जमा केलेले आहेत. ही सर्व्हिस ग्राहकांना आम्ही पुरवित आहोत.
याबाबत आपण एमएसओकडून चॅनल बंद का करण्यात आले याची विचारणा करावी. हे कायदयाचे उल्लंघन झालेले आहे. याबाबत आम्हाला योग्य तो न्याय मिळवून दयावा,अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.