
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
चार्टर्ड अकाऊंटंट (CA) इंटरमिडीएट परीक्षा २०२२ चा निकाल (Result) आज लागला आहे. या परीक्षेत नाशिकच्या दोन विद्यार्थ्यांनी मोठे यश मिळविले आहे. त्यात स्नेहा योगेश लोढा (Sneha Yogesh Lodha) ही नाशिकमध्ये पहिली तर भारतात २३ वी आली आहे. तर, नाशिकच्याच जैन बोर्डिंगचा विद्यार्थी सिद्धेश मुदगिया (Siddhesh Mudgia) हा नाशकात दुसरा तर भारतात तिसावा आला आहे...
स्नेहाचे मोठे यश
स्नेहा ही उत्तम नगर येथील मेडिकल दुकानदार श्री योगेश पारसमल लोढा आणि सौ मीनल लोढा यांची कन्या आहे. स्नेहाचे दोन्ही आजोबा म्हणजेच सुभाषचंद्र नथमल छोरिया आणि पारसमल कचरदास लोढा हो दोन्ही सीए होते. या दोघांचेही स्वप्न होते की त्यांच्या कुटुंबातील सदस्याने सीए व्हावे. आता स्नेहाच्या रुपाने लोढा आणि छोरिया कुटुंबातील व्यक्ती सीए झाली आहे. स्नेहाने १०वी पर्यंत सिम्बायोसिस शाळेत शिक्षण घेतले. त्यानंतर पुढील शिक्षण तिने बीवायके कॉलेजमध्ये घेतले.
इयत्ता दहावीत ती ९८ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली होती. सीएचे दोन्ही ग्रुप एकाचवेळी उत्तीर्ण करताना तिने राष्ट्रीय गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे. नाशकातील माईंड स्पार्क अकॅडमीचे संचालक मयूर संघवी यांचे मार्गदर्शन तिला लाभले.
सिद्धेशचे बोर्डिंगमध्ये राहून यश
सिद्धेश मुदगिया हा मूळचा वैजापूरचा आहे. त्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण वैजापुरला झाले आहे. त्याचे वडिल किराणा दुकानदार आहेत. इयत्ता ११वी पासून तो नाशिकमध्ये बीवायके कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे.
त्याची मोठी बहिण सुद्धा सीएची परीक्षा देत आहे. सिद्धेश हा जैन बोर्डिंगमध्ये राहत आहे. कसोशीने केलेल्या मेहनतीमुळेच सिद्धेशने भारतात तिसावा येणाचा बहुमान मिळविला आहे. सिद्धेशला सुद्धा माईंड स्पार्क अकॅडमीचे संचालक मयूर संघवी यांचे मार्गदर्शन लाभले आहे.