सिन्नर शहरातील व्यवहार उद्यापासून होणार सुरळीत
नाशिक

सिन्नर शहरातील व्यवहार उद्यापासून होणार सुरळीत

१४ दिवसांचा लॉकडाऊन मागे घेण्यात आल्याची तहसीलदार राहूल कोताडे यांची घोषणा

Vilas Patil

Vilas Patil

सिन्नर । प्रतिनिधी Sinnar

शहरातील करोना बाधीतांची वाढती संख्या विचारात घेऊन 21 जूलैपासून लागू असलेला लॉकडाऊनचा चौदा दिवसांचा कार्यकाळ संपल्याने उद्या (दि.5) पासून हा लॉकडाऊन मागे घेण्यात आल्याची घोषणा तहसीलदार राहूल कोताडे यांनी आज (दि.4) प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली.

आता शहर प्रतिबंधीत क्षेत्र न रहाता, ज्या भागात रुग्ण आढळून येतील, तो भाग प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात येईल व उरलेल्या शहरातील सर्व आस्थापना सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरु राहतील असे त्यांनी स्पष्ट केले.

शहरातील करोना बाधीतांची वाढती संख्या सर्वाच्याच चितेंचा विषय झाली होती. व्यापारी संघटनेच्या पुढाकारानंतर प्रशासनाने 21 जूलै पासून सिन्नर शहर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जाहीर करत बँकासह अत्यावश्यक सेवा व सर्व दुकाने 14 दिवस बंद करण्याचा आदेश दिला होता.

या काळात फक्त दवाखाने व मेडिकल दुकानेच उघडी होती. मेडीकल दुकानदारांनी स्वत:हून पुढाकार घेत दुपारी 4 वाजेपर्यंतच दुकाने सुरु ठेवली होती. या चौदा दिवसांच्या काळात शहरातील व्यापाऱ्यांसह सर्व नागरीकांनी प्रशासनाच्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद देत नियमांचे काटेकोर पालन केले. त्याची फलनिष्पत्ती म्हणून शहरातील झपाट्याने वाढणाऱ्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट दिसून आल्याचे तहसिलदारांनी या पत्रात म्हटले आहे.

प्रशासन व नागरीक यांनी करोना प्रतिबंधक कार्यवाहीला लोकचळवळीचे स्वरुप दिल्याने वाढता संसर्ग काही अंशी कमी करण्यात यश मिळाले आहे. उद्या (दि.5) प्रतिबंधक आदेशाची चौदा दिवसांची मुदत पुर्ण होत असल्याने संपूर्ण शहर प्रतिबंधीत न ठेवता ज्या भागात रुग्ण आढळून येतील केवळ तोच भाग प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले.

करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी यापूढेही सर्व नागरीकांनी दक्ष रहावे व शासनाच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन त्यांनी केले आहे. विनाकारण घराबाहेर पडून घोळक्याने जमणे, गप्पा मारणे सर्वांनी टाळावे. मास्कचा वापर केवळ गळ्यात अडकवण्यासाठी न करता घराबाहेर पडल्यानंतर पूर्ण वेळ मास्क वापरावा. मास्क न वापरणारे विक्रेते व नागरीक यांना समज द्यावी.

सार्वजनिक ठिकाणी थुकणाऱ्यांना त्यांच्या कृतीमूळे होणाऱ्या परिणामांची जाणीव करुन द्यावी. सामाजिक अंतराचे पालन करावे असे आवाहन या पत्रकात करण्यात आले आहे. 65 वर्षावरील व्यक्ती व 10 वर्षाच्या आतील मूले, गर्भवती महिला यांनी वैद्यकिय कारणांशिवाय घराबाहेर पडू नये, वारंवार हात धूणे, स्पर्श होणाऱ्या जागा व वस्तू यांची वारंवार फवारणी व निर्जतूंकीकरण करण्यावर भर द्यावा असे आवाहनही तहसिलदारांनी केले आहे.

व्यवहार होणार सुरळीत

तहसिलदारांच्या या आदेशामूळे शहरातील सर्व व्यवहार उद्या (दि.5) पासून सुरळीत सुरु होणार आहेत. या चौदा दिवसांच्या काळात सर्व बँका, पतसंस्था बंद होत्या. त्यांचे व्यवहारही सुरळीत होतील. या काळात आडव्या फाट्यावरील भाजीबाजार बंद होता. तो ही सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. शहरातील सर्व आस्थापनांची वेळ सकाळी 9 ते 7 असून प्रत्येक आस्थापनामध्ये सामाजिक अंतराचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

प्रत्येक आस्थापनेत 5 पेक्षा अधिक व्यक्तींना प्रवेश असणार नाही. विवाहासाठी पूर्वीप्रमाणेच 50 व्यक्तींना परवानगी असेल तर अंत्यविधी व दशक्रिया विधीसाठी असणारे 20 व्यक्तींच्या मर्यादेचे पालन सर्वांनी करावे असे आवाहनही तहसिलदारांनी केले आहे. शहरातील सर्वांनी सुचनांचे पालन करुन करोना विषाणूंच्या निर्मूलनाच्या या कार्यात सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com