
सटाणा । प्रतिनिधी Satana
शहरातील मालेगाव रस्त्यावरील ( Malegaon Road )घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा सुमारे 2 लाख 40 हजारांचा एैवज लंपास केला. भरदिवसा झालेल्या या धाडसी घरफोडीमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली असून शहरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, फोटोग्राफीचा व्यवसाय करणारे मंगेश बापू सोनवणे हे सटाणा-मालेगाव रस्त्यावरील आनंद मिल शेजारी आपल्या स्वतःच्या राहत्या घरी आई नंदा सोनवणे, पत्नी प्रियंका व मुलगी अवनी यांच्यासह राहतात. त्यांच्या लहान मुलीची तब्येत बरी नसल्याने आई व पत्नी यांना सोबत घेऊन ते शहरातील दवाखान्यात मुलीला दाखल करून सोनवणे फोटोग्राफीच्या कामासाठी जय मल्हार लॉन्समध्ये गेले.
दरम्यान आपले काम आटोपून सायंकाळी सहा वाजता आई, पत्नी व मुलीला घेऊन ते घरी परतले असता घराच्या कुलूप तुटलेला व दरवाजा उघडा असल्याचे दिसून आले. त्यांनी घरात प्रवेश केला असता घरातील दोन लोखंडी कपाट तोडून त्यातील साठ हजार रुपयांची रोकड, चार तोळ्यांची एक लाख वीस हजार रुपयांची माळ व 60000 रुपये किमतीची सोन्याची माळ असा सुमारे दोन लाख 40 हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी पळवून नेल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी त्वरीत याची माहिती पोलिसांना दिली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. याप्रकरणी सटाणा पोलिसांनी मंगेश सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भादवी कलम 454 व 380 अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.