
नाशिक । प्रतिनिधी
नाशिक महापालिकेची पुढील वर्षात होणारी सार्वत्रिक निवडणुक व करोनामुळे उत्पन्नात झालेली घट या पार्श्वभूमीवर कोणतीही करवाढ नसलेले नवीन अर्थिक वर्ष सन 2021 - 22 चे 2361 .56 कोटींचे अदांजपत्रक आणि सन 2020 - 21 चे सुधारित अंदाजपत्रक आज आयुक्त कैलास जाधव यांनी स्थायी समितीला सादर केले. यावर चर्चा होऊन सदस्याच्या विकास कामांच्या सुचनांचा समावेश करुन या आयुक्तांच्या अंदाजपत्रक सभापती गणेश गिते यांनी मंजुरी दिली...
नाशिक मनपा स्थायी समितीच्या आजच्या अंदाजपत्रकीय सभेत महानगरपालिकेचे मागिल वर्षाचे सुधारित अंदाजपत्रक व नवीन वर्षाचे अंदाजपत्रक सभापती गितेे यांना आयुक्त कैलास जाधव यांनी सादर केले.
यात नवीन वर्षात कोणतीही करवाढ सुचविण्यात आलेली नाही. मात्र चालु अर्थिक वर्षात करोना साथीचा मोठा फटका महापालिकेला बसला आहे. महापालिकेच्या स्वउत्पन्नात मोठी घट झाल्यानंतर याचा परिणाम चालु वर्षातील सुधारित व नवीन 2021 - 22 वर्षाच्या अंदाजपत्रकात दिसुन आला आहे.
सन 2020 -21 च्या सुधारित अंदाजपत्रक तयार करतांना यात 739.78 कोटींच्या आरंभीच्या शिल्लकेसह 2239.37 कोटी रु. जमा व 1985.51 कोटी रु. खर्चाचे सुधारित अंदाजपत्रक आयुक्तांनी सादर केले.
या सुधारित अंदाजपत्रकानुसार अखेरची शिल्लक 253.86 कोटी रु. दर्शविण्यात आली आहे. नवीन अर्थिक वर्ष 2021 - 22 या अर्थिक वर्षासाठी 253.86 कोटी रु. या आरंभीच्या शिल्लकेसह 2361.56 कोटी रु. जमा आणि 2359.48 कोटी रु. खर्चाचे अंदाजपत्रक सादर केले.
आयुक्तांच्या बजेट मधील महत्वाच्या बाबी
* शहर बससेवेसाठी 110 कोटीची तरतुद.
* 23 खेड्यांत खडीकरण, डांबरीकरण व रुंदीकरणाने रस्ते जोडणार.
* हरीत क्षेत्र विकासात ऊड्डाणपुलासह नवीन पुल व अन्य सुविधा.
* मार्च ते एप्रिलपर्यंत कर भरणार्यांना सवलत पुन्हा सुरू.
* रामायण बंगल्याजवळ 12 मजली नवीन इमारत
* पंचवटीत महिलांसाठी नवीन जलतरण तलाव
* गंगापुररोड, आडगावला नवीन व्यावसायीक संकुल.
* रस्ते व चौकांचे ट्रॅफीक ऑडीट होणार.
यंदा नवीन कामांसाठी 476 कोटी रु.
माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी वाढलेला स्पील ओव्हर कमी करण्यासाठी त्यांच्या काळात अनावश्यक कामांना ब्रेक लावतांना केवळ त्रिसुत्रीचा अवलंब करीत अंदाजपत्रकात मंजुर कामे केली होती. हा निर्णय त्यांनी महापालिकेची अर्थिक परिस्थीती नाजुक असल्याने घेतला आणि महापालिकेला स्पीलओव्हर कमी करण्याचे काम झाले. त्यानंतरही अद्यापही महापालिकेच्या स्वताच्या उत्पन्ना वाढ झालेली नाही. महापालिकेतून दोन हजाराच्यावर कर्मचारी व अधिकारी निवृत्त झालेले असल्याने अपुर्ण मनुष्यबळामुळे कर वसुलीवर आलेली मर्यादा व मागील विकास कामांचेी 488 कोटीची देणी वगळून आता नवीन अंदाजपत्रक अन्य खर्च वगळता नवीन विकास कामांसाठी केवळ 476 कोटी रु. चा निधी असणार आहे.