उद्या नाशिक महापालिकेची अंदाजपत्रकीय महासभा
महानगरपालिका

उद्या नाशिक महापालिकेची अंदाजपत्रकीय महासभा

२७५९ कोटींचे अंदाजपत्रक सादर होणार

नाशिक | Nashik

करोनामुळे तब्बल दोन महिने रखडलेले महापालिकेचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक आता मार्गी लागणार आहे.

महापौर सतीश कुलकर्णी यांनी येत्या सोमवारी (दि. ३१) अंदाजपत्रकीय महासभा बोलाविली आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षाकरिता महापालिकेचे तब्बल २७५९ कोटी रुपयांचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक स्थायी समिती सभापती गणेश गिते यांच्याकडून महासभेच्या मान्यतेसाठी सादर केले जाणार आहे.

महापालिकेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रभागांमध्ये विकासकामांसाठी नगरसेवकांना भरघोस निधी उपलब्ध करून देतानाच पंचवटी, नवीन व सातपूर भागांत तीन विशेष कोविड रुग्णालये उभारण्यासाठी या अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली आहे.

महापालिकेचे २०२१-२२ या आर्थिक वर्षाचे २३६१ कोटी रुपयांचे प्रारूप अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक आयुक्त कैलास जाधव यांनी मार्च महिन्यात स्थायी समितीच्या मान्यतेसाठी सादर केले होते.

करोना संकटामुळे विकासकामे अडचणीत आल्याने नागरिकांचा रोष पत्करलेल्या नगरसेवकांना विकासकामांसाठी प्रत्येकी ४० लाखांची भरीव तरतूद करताना, दोनशे कोटी रुपयांचे नवीन रस्ते, पूल व सांडवे बांधण्यासाठी २० कोटींची तरतूद आयुक्तांनी या अंदाजपत्रकात केली होती.

विशेष म्हणजे करोनामुळे महापालिकेच्या महसुलात घट झाली असली, तरी घरपट्टी, पाणीपट्टीसारख्या नागरिकांशी थेट संबंध असलेल्या करांमध्ये कोणतीही वाढ न करण्याची दिलासादायक भूमिका आयुक्त जाधव यांनी घेतली होती.

नगररचना विभागाकडून युनिफाईड डीसीपीआरमुळे बांधकामाची जास्ती जास्त प्रकरणे येतील, हे गृहीत धरून साडेचारशे कोटी रुपयांपर्यंत उत्पन्न गृहीत धरण्यात आले होते.

आयुक्तांचे हे अंदाजपत्रक सादर झाल्यानंतर सभापती गिते यांनी स्थायीची विशेष अंदाजपत्रकीय सभा बोलावत या अंदाजपत्रकाला दुरुस्तीसह मंजुरी दिली होती. दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करून दि. १९ मे रोजी तहकूब झालेल्या महासभेचे कामकाज सोमवारी सकाळी ११.३० वाजता सुरू होईल. त्यानंतर अंदाजपत्रकीय महासभा सुरू केली जाणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com