बीएसएनएलच्या 'इतक्या' टॉवर उभारणीस मंजुरी; संपर्क यंत्रणा प्रभावशाली होणार

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार यांचा पाठपुरावा
बीएसएनएलच्या 'इतक्या' टॉवर उभारणीस मंजुरी; संपर्क यंत्रणा प्रभावशाली होणार

पुनदखोरे | वार्ताहर

कळवण-सुरगाणा तालुक्यात ( Kalwan & Surgana Taluka )केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या पाठपुराव्याने बीएसएनएलचे 44 टॉवर मंजूर झाले आहे. त्यात कळवण तालुक्यात 7 तर सुरगाणा तालुक्यात 37 होणार आहेत. या टॉवरमुळे संपर्क यंत्रणा प्रभावशाली होणार आहे.

कळवण सुरगाणातील अनेक गावे दूरसंचार विभागाच्या दुर्लक्षामुळे मोबाईल सेवेपासून वंचित होते. त्यामुळे अतिदुर्गम भागातील आदिवासी व बिगर आदिवासी समाज दैनंदिन घडामोडीपासून कोसो दूर होते. मोबाईल कंपन्या व लोकप्रतिनिधींकडे वारंवार मागणी करूनही मोबाईल सेवा मिळत नव्हती. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचेकडे मागणी केली होती. पवार यांनी नागरिकांची अडचण ओळखून केंद्राच्या दूरसंचार विभागाकडे पाठपुरावा करून जिल्ह्यात 131 टॉवरला मंजुरी मिळविली आहेत.

यात कळवण तालुक्यातील आमदार, लिंगामे, धार्डेदिगर, सिद्धार्थनगर, मळगावबु. कोसवण व उंबरदे या गावात नवीन टॉवर मंजूर झाले आहेत. तसेच सुरगाणा तालुक्यात 37 टॉवर मंजूर झाले आहेत. उर्वरित गावात लवकरच नवीन टॉवर मंजूर केले जाणार आहेत.

नव्याने मंजूर झालेल्या टॉवरमुळे तालुक्यातील शेतकर्‍यांना शेत मालाचे बाजारभाव, विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण, आरोग्य सेवा तसेच दैनंदिन व्यवहार, व इतर महत्वाच्या कामांसाठी फायदा होणार आहे. हे टॉवर मंजूर झाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातारवण आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com