करोना मृत्यूदर शून्यावर आणा : पालकमंत्री भुजबळ

आढावा बैठकीत सूचना
करोना मृत्यूदर शून्यावर आणा : पालकमंत्री भुजबळ

नाशिक । प्रतिनिधी Nashik

लॉकडाऊनच्या विरोधात आपली भूमिका नसून सर्वांना सोबत घेऊन काम करण्यावर भर आहे. पुढील आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तज्ज्ञांसमवेत नाशिक दौर्‍यावर येणार आहेत त्यावेळी लॉकडाऊन तसेच इतरही अनुषंगिक निर्णय मुख्यमंत्री यांच्यासमवेत चर्चा करून घेतले जातील. करोना मृत्यूदर शून्यावर आणा अशा सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात करोना आढावा बैठकीत ते बोलत होते. महापालिकेने संपर्क अधिकार्‍याची नेमणूक करावी व रुग्ण व्यवस्था, प्रवेश, बिल्स, इत्यादी बाबींवर नियंत्रण ठेवण्याची सर्व जबाबदारी त्या अधिकार्‍यांवर असेल. त्यांचे संपर्क क्रमांक नागरिकांकडे असावेत. मविप्र रुग्णालयाचे संपूर्ण व्यवस्थापन यापुढे महानगरपालिकेकडे असेल. महापालिकेने कायमस्वरूपी व्हेंटिलेटर्स व ऑक्सिजन बेडची व्यवस्था करावी व अन्य महापालिकांनी ज्या पद्धतीने रुग्णालय अधिगृहित केली आहेत त्या पद्धतीने नाशिक मनपाने या रुग्णालयाचे संपूर्ण व्यवस्थापन करावे.

तसेच मविप्र रुग्णालयाच्या सनियंत्रणासाठी अतिरिक्त मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर यांची नियुक्ती करावी असे निर्देश भुजबळ यांनी दिले. महानगरपालिकेने रुग्णालयांमध्ये आयसीयु युनिट वाढवावेत. तसेच त्यासाठी तज्ज्ञ वैद्यकीय व्यावसायिकांच्या सेवा अधिग्रहित करण्यात याव्या व नर्सेस इत्यादी स्टाफ कायमस्वरूपी वेतन पटलावर घेण्यात यावा. एसएमबीटी रुग्णालयामध्येमध्ये १०० बेडसची व्यवस्था करण्यात यावी व पुढील आठवड्यात त्याठिकाणी रुग्ण दाखल करण्यास सुरुवात करावी.

जिल्ह्यातील डेथ रेट कमी करण्याबाबत अधिक प्रयत्न व्हावा. एक सुद्धा मृत्यू होता कामा नये, अशा सूचना शासनाच्या आहेत त्यामुळे महाराष्ट्राच्या तुलनेत आपण जिल्ह्यात कमी डेथ रेट आहेत यावरही समाधानी न राहता तो शुन्यावर आणण्यासाठी प्रयत्न करावेत. ज्या ठिकाणी लॉकडाऊन नव्याने सुरू आहे त्या ठिकाणी करोनाची साखळी तुटलेली नसून उलट लॉकडाऊनच्या भितीने झालेल्या गर्दीतून मोठ्या प्रमाणावर रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. अर्थचक्र नव्याने सुरू करण्यात अनेक अडचणी येतात त्यामुळे लॉकडाऊनचा निर्णय विचारपूर्वक घ्यावा लागणार आहे.

बेडची मुबलक संख्या

शहर व जिल्ह्यात बेडची संख्या मुबलक प्रमाणात आहे. जिल्हा रुग्णालयात अधिक ४० व्हेंटिलेटरची व्यवस्था करण्यात यावी. ठक्कर डोम मध्ये भविष्यातील संकटाचे पूर्वनियोजन म्हणून व्यवस्था करण्यात येत आहे, मात्र अद्याप आपल्याकडे करोना केअर सेंटरचे १२०० बेडस शिल्लक असल्याने ते अपुरे पडल्यानंतर ठक्कर डोमसह इतर ठिकाणी जादा सोय करण्याचा विचार करण्यात येईल अशी माहिती महापालिका आयुक्त गमे यांनी दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com