नवीन नाशिक । Nashik

नाशिक महानगर पालिकेच्यावतीने अतिक्रमण मोहिम राबवित असतांना छोटा हत्ती गाडीतून भाजी विक्री करणाऱ्या विक्रेत्याचा वजनकाटा परत करण्यासाठी पाचशे रूपयांची लाच मागितल्याचा प्रकार घडला आहे.

विशेष म्हणजे ही लाच नवीन नाशिक विभागीय कार्यालयात स्विकारण्यात आली असून यापूर्वीही अनेकवेळा अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांवर लाच घेण्याचे आरोप होत असतांना आता थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केल्याने महानगर पालिकेचा अतिक्रमण विभाग पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

याबाबत माहिती अशी की, तक्रारदार हे शिवाजी चौका जवळील महानगर पालिका दवाखान्यासमोर गाडीतून कांदे व बटाटे विक्री करीत हाते. यावेळी अतिक्रमण विभागातील सेवक प्रकाश माधवराव चव्हाण यांनी तक्रादाराच्या गाडीतील वजनकाटा जप्त केला. हा वजनकाटा परत देण्यासाठी आणि कोणतीही कारवाई न करण्यासाठी दोनशे रूपयांची लाच मागितली.

हा प्रकार तक्रारदारांनी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाला कळविल्यानंतर नवीन नाशिक विभागीय कार्यालयात सापळा रचण्यात आला. यावेळी प्रकाश चव्हाण यांनी मागणी केली होती, तर राजेंद्र पुंडलिक निगळ यांनी पाचशे रूपयांची लाच स्विकारतांना त्यांना ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी प्रकाश चव्हाण आणि राजेंद्र निगळ यांच्यावर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने पाचशे रूपयांची लाच घेतली म्हणून कारवाई केली आहे.

अतिक्रमण विभागाबाबत अनेकदा नगरसेवकच काय तर नागरिकांही तक्रार करीत असतात. अतिक्रमण विभागातील सेवकांचे अतिक्रमण करणाऱ्यांशी आर्थिक हितसंबंध असल्याचे आरोप वारंवार होत असतांना महानगर पालिका प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नव्हती. आज मात्र लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केल्याने अतिक्रमण विभाग पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.