नाशिक l Nashik (प्रतिनिधी)

गेल्या काही दिवसापासून राज्यासह नाशिक शहरात करोना रुग्णांमध्ये वाढ होताना दिसून येत असल्याच्या पार्श्वभूमीवर उद्यापासून रात्री अकरा ते पहाटे पाच वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता संचारबंदीचे जाहीर करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

करोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत करोना आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी सुरज मांढरे, पोलीस आयुक्त दिपक पांडे, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, मुख्याधिकारी लीना बनसोड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे, निवासी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत खैरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, डॉ. अनंत पवार, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, डॉ. आवेश पलोड, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत यांच्यासह अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी संचारबंदीचा मोठा निर्णय घेण्यात आला.

यासह शहरात विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर पोलीस आणि मनपा यांच्या संयुक्त विद्यमाने १००० रुपये दंडाची कारवाई किंवा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसेच लग्न समारंभात 100 लोकांपेक्षा जास्त लोकांना परवानगी नाकारण्यात आली असून पोलीसांतर्फे लग्न समारंभात देखील विनामास्क असणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

नाशिक शहरात सॅनिटायझरचा वापर करीत नसलेल्या दुकानदारांवर कारवाईचे आदेश प्रशासनाला दिले आहे. येत्या आठ दिवसांत जर परिस्थिती नियंत्रणात आली नाही तर संचारबंदी कडक करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार असल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले.

सध्या प्रशासनातर्फे सरकारी सेवकांना देण्यात येणारी लस त्यांनी २८ फेब्रुवारी पर्यंत घ्यावी अन्यथा त्यानंतर त्यांना त्यासाठी शुल्क आकारले जाऊ शकते असे भुजबळ यांनी सांगितले.