नशा करणार्‍यांवर बहिष्कार टाका: मौलाना सैय्यद अमीन

नशा करणार्‍यांवर बहिष्कार टाका: मौलाना सैय्यद अमीन

मालेगाव । प्रतिनिधी | Malegaon

कुत्तागोळी, नशेचे इंजेक्शन (Drug injection), मद्य (alcohol), गुटखा (gutkha) आदी नशेच्या आहारी गेलेले विशेषत: तरूण वर्ग गुन्हेगारीकडे (criminality) वळल्याचे भिषण व दुर्दैवी चित्र चिंता वाढविणारे ठरले आहे. कुटूंबासह समाज व देशाची हानी नशेच्या सवयीमुळे होत असल्याने हे चित्र बदलण्यासाठी आता समाजास सक्रिय होण्याची गरज आहे.

यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. नशा करणार्‍यांची प्रथम समजूत काढा तरीही न ऐकल्यास सामाजिक बहिष्काराची (Social exclusion) धमकी द्या या धमकीचाही परिणाम न झाल्यास नशा करणार्‍यावर सामाजिक बहिष्काराचा पवित्रा उचला, असे आवाहन सुन्नी दावते ए इस्लाम संघटनेचे अध्यक्ष मौलाना सैय्यद अमीन उल कादरी (Maulana Syed Amin ul Qadri, President of Sunni Dawate e Islam Organization) यांनी येथे बोलतांना केले.

शहरात कुत्तागोळी, दारू, चरस आदी नशेच्या आहारी जाण्याचे तरूणांचे (youth) प्रमाण वाढले असल्याने व्यसनमुक्त तरूण हे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवत येथील सुन्नी दावते इस्लामी या संघटनेच्या वतीने येथील एटीटी हायस्कुल (ATT High School) प्रांगणात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करतांना मौलाना सैय्यद अमीन बोलत होते. या कार्यक्रमास हजारोच्या संख्येने तरूण, नागरीक उपस्थित होते.

तरूणांनी नशा व गुन्हेगारीपासून (Addiction and crime) लांब राहण्याची गरज आहे. नशेमुळे इस्लाम व मुस्लीम समाजाची बदनामी होणार नाही याची दक्षता प्रत्येक तरूणाने घेतली पाहिजे. नशा करणारे व विकणारे असो की अश्लील चित्रपट (pornographic movies) पाहणारे, महिलांवर वाईट नजर टाकणारे किंवा कुणाची फसवणूक (Fraud) करणारे असो या सर्व पापाचा हिशोब तुम्हास खुदास द्यावा लागेल हे विसरू नका, असा इशारा देत मौलाना सैय्यद अमीन पुढे म्हणाले, नशा सुटत नाही हे सांगणारे दिशाभुल करत असतात.

अमृतासमान असलेले आईचे दूध आपण सोडू शकतो तर नशा कां सुटत नाही. नशेमुळेच खून (murder), चोरी (theft), दरोडा (robbery), आत्महत्यासारख्या गुन्हेगारीच्या घटना वाढल्या आहेत. विशेषत: तरूण वर्ग नशेच्या आहारी जावून गुन्हेगारीकडे वळू लागले आहेत. नशेमुळे तरूणांचे आरोग्य (health) बिघडून ते विविध आजारांनी ग्रस्त होत आहेत. याचा फटका त्यांच्या कुटूंबासह समाजास पर्यायाने शहरास देखील बसत असल्याने या तरूणांना नशेपासून परावृत्त करण्यासाठी आता समाजानेच पुढाकार घेण्याची गरज आहे.

नशा करणार्‍या तरूणांची समजूत काढत नशेमुळे होत असलेल्या दुष्पपरिणामाची जाणीव करून द्या. तरीही तो ऐकत नसेल तर त्यास सामाजिक बहिष्काराची धमकी द्या. या धमकीचाही जर उपयोग होत नसेल तर त्याला सुधारण्यासाठी सामाजिक बहिष्कार टाकावा. नशा करणार्‍यांना कुठल्याही स्वरूपाची मदत किंवा साथ देवू नका, असे आवाहन त्यांनी पुढे बोलतांना केले

नशा करणार्‍यांनाच नव्हे तर त्यांना साथ देणार्‍यांनाही खुदाजवळ हिशोब द्यावा लागणार असल्याचे भान प्रत्येकाने ठेवावे. नशेची साधने जितकी बंद होतील तितके दवाखाने व तुरूंग देखील बंद करावे लागणार आहेत. त्यामुळे नशा करणारे व विकणार्‍यांच्या विरोधात समाजाने उभे राहावे, असे आवाहन मौलाना सैय्यद अमीन यांनी शेवटी बोलतांना केले. एजाज बेग, डॉ. खालीद परवेज, मुस्तकीम डिग्नेटी, प्रा. रिजवान खान, रियाज शाह, राजू गाईड आदींसह कुलजमात, सुन्नी जमात मौलवी, विद्यार्थी तसेच महिला मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होत्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com