'या' तळीरामांना आवरणार कोण?

'या' तळीरामांना आवरणार कोण?

सिन्नर | विलास पाटील Sinnar

शहराच्या बाहेरच्या बाजूला असणार्‍या मोकळ्या जागांवर अंधार पडताच तळीरामांचा कब्जा होऊ लागला असून दारूच्या रिकाम्या बाटल्या (bottles of liquor) फोडून घराकडे परतणार्‍या या तळीरामांमुळे माणसांबरोबर पशुधनाचेही जीव धोक्यात आले आहेत. पशुधनाच्या हक्कांच्या जागांवर अतिक्रमण करणार्‍या तळीरामांना नेमकं आवरणार कोण असा प्रश्न निर्माण होत आहे.

देशी -विदेशी दारू (Domestic-foreign liquor) विक्रीसाठी शासन परवाना देते. दारू पिण्यासाठीही शासन परवाना देत असल्याने दारू (Alcohol) पिण्याला विरोध असण्याचे कारण नाही. मात्र, दारू कुठे प्यावी यासाठी शासनाने नियम बनवले असून तळीरामांना खास पिण्यासाठी बसता यावे यासाठी बियर बार (Beer bar), परमीट रुमच्या (Permit room) नावाखाली परवानगी देण्यात आली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक बिअर बार व परमिट रुम सिन्नर तालुक्यात (sinnar taluka) मंजूर आहेत.

मात्र, या बिअर बार, परमिट रूममध्ये वाईन शॉपच्या (Wine shop) तुलनेत दारू महाग मिळते. पुन्हा दारू बरोबर काहीतरी खायला पाहिजे म्हटल्यावर पिण्याचा खर्च अजूनच वाढत जातो. त्यामुळे वाईन शॉपमध्ये दारू घ्यायची आणि गावाच्या बाहेर कुठेतरी बाजूला मोकळी जागा बघून तेथेच दारुसाठी बैठक मारण्याचे प्रकार गेल्या चार-पाच वर्षांपासून वाढले आहेत.

नगरपरिषदेची हद्दवाढ झाली असली तरी शहराच्या सर्वच बाजूला अजूनही शेती आणि शेतकरी (farmers) जिवंत आहेत. त्यांच्याकडे असणार्‍या पशुधनासाठी मोकळ्या जागेवरील वाढलेले गवत हे हक्काचे अन्न आहे. पशुधनाला चरण्यासाठी हक्काची जागा म्हणून शासनाने प्रत्येक गावात गायरान राखीव ठेवले आहे. त्यामुळे या गायराना बरोबरच मोकळ्या जागांवरील वाढलेल्या गवतात शेतकरी पावसाळ्यानंतर आपले पशुधन चरण्यासाठी मोकळे दोर बांधून सोडत असतात.

मात्र, गेल्या काही वर्षांपासून शहरातील तळीरामांनी या जागांवर आपला हक्क प्रस्थापित केला असून सायंकाळनंतर ठिकठिकाणी रस्त्याच्या आतल्या बाजूला मोबाईलच्या लाईटमध्ये पिण्यासाठी बसलेले तळीराम आपल्याला नेहमीच दिसतात. या मोकळ्या जागांमध्ये खडक असतील तर या तळीरामांची आवडती जागा बनते.

याच गावाबाहेरील मोकळ्या जागेत शहरातील अबालवृद्ध दररोज पहाटे फिरण्यासाठी येतात. याच खडकांचा ते व्यायामासाठी उपयोग करीत असतात. कोणी सूर्यनमस्कार, जोर-बैठका या खडकावर मारतात. तर कुणी पहाटे पहाटे हास्याचे कारंजे उडवत, टाळ्या वाजवत आपलं आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न करीत असतात. मात्र, तळीरामांना याच्याशी काहीही देणे-घेणे नसते.

खडकावर पाय पसरून बसणार्‍या या तळीरामांकडून परिसराला बकाल बनविण्याचे काम सुरू झाले आहे. दारू बरोबर चखण्यासाठी बांधून आणलेल्या माल मसाल्याचे कागद, प्लॅस्टिकच्या पिशव्या तेथेच फेकून दिल्या जातात. पाण्याच्या रिकाम्या बाटल्याही अस्ताव्यस्त फेकल्या जातात. चायनीज पदार्थांसह भेळ भत्ताही खडकावर पसरतो.

हेच खरकटे खाण्यासाठी जनावरे, भटकी कुत्री सकाळी गर्दी करतात. या खरकट्याबरोबरच प्लास्टिक पिशव्या, ग्लासही हे जनावरे फस्त करतात. त्यातून त्यांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. हे कमी की काय म्हणून आता दारूच्या रिकाम्या बाटल्या खडकावरच फोडून जाणार्‍यांची संख्या वाढली आहे. खरं तर या रिकाम्या बाटल्या तशाच पडून राहिल्या तर त्या विकून एखाद्याला त्यातून रोजगारही मिळू शकतो. अनेक भंगार गोळा करणारे आता चार-आठ दिवसांनी या परिसरात फेरफटका त्यामुळेच मारू लागले आहेत.

मात्र, फुटलेल्या बाटल्यामुळे त्यांचा भ्रमनिरास होऊ लागला आहे. या फुटलेल्या बाटल्यांच्या काचांमुळे उद्या आपल्यालाच बसता येणार नाही याचेही भान हे तळीराम ठेवेनासे झाले आहेत. त्याचा फटका पहाटे व्यायामाला येणार्‍या सिन्नरकरांना बसू लागला आहे. या काचांमुळे कुणीही खडकावर व्यायामासाठी बसू शकत नाही.

वाढलेल्या गवतामुळे जमिनीवर बसून व्यायाम करणेही शक्य होत नाही. त्यामुळे या जागांना वळसा मारून फिरणार्‍यांना घराकडे परतावे लागत आहे. तर फिरणार्‍या जनावरांच्या, भटक्या कुत्र्यांच्या पायांना या काचांमुळे जखमा होऊन त्यांचे चालणेही अवघड बनते आहे. उकाडे मळ्यातील अनेक शेतकर्‍यांच्या पशुधनांचे पाय या काचांमुळे रक्तभंबाळ होत आहेत. खाण्याच्या हेतूने जाणार्‍या मुक्या जनावरांच्या जिवावर या काचांमुळे बेतत असून रिकाम्या बाटल्या फोडून जाणार्‍या तळीरामांना आवरणार कोण?

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com