मोहाडीत बोहाडा उत्सव

मोहाडीत बोहाडा उत्सव

दिंडोरी । प्रतिनिधी | Dindori

देवतांना साकडे घालून सर्वत्र चांगला पाऊस (monsoon) पडावा व सुख-समृद्धी नांदावी यासाठी मोहाडी (mohadi) ता.दिंडोरी येथील बोहाडा उत्सवाला गुरूवारी सुरुवात झाली असून

मोहाडी च्या या बोहाडा उत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा आहे. हा उत्सव आठवडाभर चालणार असून सुरूवात विचारीने व गणपती आगमनाने होऊन सांगता मंगळवारी 28 जूनला सकाळी नृसिंह अवताराने होईल.

या निमित्ताने ग्रामदैवत मोहाडमल्ल मंदिरासमोर तेल जाळणे व देव-देवतांची सोंगे नाचवणे असा मुख्य कार्यक्रम असतो. रामलिलेसाठी गावातील सर्व जाती-धर्माचे लोक एकत्र येतात व आपल्याला वंशपरंपरेने वाटून दिलेली मुखवटे, सोंगे नाचवतात. यानिमित्ताने सामाजिक समतेची व एकात्मतेची अनोखी भावना ग्रामस्थ पाळतात.

यात माळी समाजाकडे भिम बकासुर, आसळी, गजासुर, पाकुळी व गवळणी, सुतार समाजाकडे देवी व सारजा गणपती, ब्राह्मण समाजाकडे नारद व नृहसिंह, धनगर समाजाकडे साती आसरा (अप्सरा ),तेली समाजाकडे काट्या मारुती व रावण, आदिवासी समाजाकडे मासा , महिषासुर, यम ,तर सोनार समाजाकडे एकादशी, दलित समाजाकडे झुटिंग, नाभिक समाजाकडे वीरभद्र, शिंपी समाजाकडे इंद्रजीत, भैरव, खंडेराव, महादेव पार्वती, मराठा समाजाकडे थोरातांकडे नकटवडी, सोमवंशीकडे वेताळ अशी परंपरागत सोंगे दिलेली आहेत.

ज्यांच्याकडे सोंगे नाहीत पण रामलीलेत भाग घ्यायचा आहे अशा हौशी तरुणांसाठी अंधश्रद्धा उद्बोधक ध्वज पर्वणी, भुताळ्या भगत, नाच्या हे सार्वजनिकमोहाडी रामलीला (बोहाडा) उत्सवाला सुरुवात ठेवलेली असतात. संबळावर नाचत सोंग मध्यभागी मोहाडमल्ल मंदिरासमोर आल्यावर लोहार, ब्राह्मण, थोरात, ठाकूर संयुक्तपणे सोंगाची सबादणी करतात.

सबादणी म्हणजे सोंगाची किंवा त्या देवतेची ओळख देऊन व त्याने पुराणात केलेले कार्य सांगून लोकांचे उद्बोधन करतात. दोन सोंगामधील वेळेत वाघ्या मुरळीचा गाण्यांचा तसेच कथांचा कार्यक्रम होतो. गावातील वाघ्या मुरळी चे जथ्ये भाग घेतात. मोहाडमल्ल महाराज मंदिराला मांडव टाकण्याचा मान माळी समाजाकडे, दीपमाळ तेवत ठेवण्याचा मान आदिवासी समाजाकडे तर सोंगाना नैवद्य देण्याचा मान धनगर समाजाकडे आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com