घोटी l Ghoti (वार्ताहर)

घोटी परिसरात टोलनाक्या जवळ मुंबई-आग्रा महामार्गावर एका परप्रांतीय ट्रकचालकाचा मृतदेह जखमी अवस्थेत आढळून आला आहे. त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याने खळबळ उडाली आहे.

या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेऊन तपासकामी सूचना दिल्या. आज मध्यरात्रीची ही घटना आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की आज (दि. २) रोजी मुंबईहून नाशिकच्या दिशेने जाणारा ट्रक (WB २३/D २६०३) हा घोटी महामार्गावर हॉटेल किनारा समोर चालू स्थितीत उभा होता. याच ठिकाणी या ट्रकचा चालक गौतम अरुण दास, (वय ६०), रा. कोलकता (पश्चिम बंगाल) हा महामार्गाच्याकडेला गवतात जखमी अवस्थेत मृत स्थितीत आढळून आला. (दि. २) रोजी पहाटे दीड ते सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली.

घटनेची माहिती मिळताच घोटी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक जालिंदर पळे यांच्यासह पोलिसांच्या पथकाने धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. नाशिक ग्रामीण विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक शर्मिला वालावलकर, उपअधीक्षक अर्जुन भोसले, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी आदींनी घटनास्थळी भेट देऊन तपासकामी सूचना दिल्या.

याबाबत मृत चालक गौतम अरुण दास याच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी अहवाल आल्यानंतरच चालकाच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील, अप्पर अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली घोटी पोलीसांनी आकस्मित मृत्युची नोंद करून घटनेचा तपास करीत आहे.