
सिन्नर । प्रतिनिधी Sinnar
वै. बस्तीरामजी नारायणदास सारडा यांच्या 58 व्या पुण्यतिथीनिमित्त येथील शेठ ब. ना. सारडा विद्यालय व ‘ दै. देशदूत’ने आज (दि. 19) रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. सारडा विद्यालयात आयोजीत रक्तदान शिबीरात 157 रक्तदात्यांनी रक्तदान करत वै. बस्तीरामजी सारडा यांना आदरांजली वाहिली. रक्तदान शिबीराचे हे सहावे वर्ष आहे.
दै.‘देशदूत’ च्या जाहिरात विभागाचे सरव्यवस्थापक अमोल घावरे यांच्या हस्ते शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. त्यापूर्वी वै. सारडा यांच्या अर्धपुतळ्याचे पुजन करण्यात आले. शालेय समितीचे अध्यक्ष बापूसाहेब पंडित, अनिल करवा, डॉ. प्रशांत शिंदे, पियुष लोया, अनिल असावा, मुख्याध्यापक अरुण गायकवाड, पर्यवेक्षक बी. एच. वाघ, चांडक कन्याच्या मुख्याध्यापिका रेखा हिरे, संजीवनी प्राथमिकच्या मुख्याध्यापिका माया गोसावी, आयटीआयचे प्राचार्य शिवराज सोनवणे, कला-वाणिज्य महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य विनोद निरभवने, जनकल्याण रक्तपेढीचे वैद्यकीय अधिकारी गोविंद कुलकर्णी व्यासपीठावर उपस्थित होते.
आपणही समाजाचे काही देणं लागतो या भावनेतून दरवर्षी होणारा रक्तदानाचा उपक्रम कौतूकास्पद असल्याचे डॉ. प्रशांत शिंदे म्हणाले. गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. सुत्रसंचलन केशव रायते यांनी केले. पाहुण्यांचा परिचय क्रीडाशिक्षक राठोड यांनी करुन दिला. सिन्नर वकिल संघाचे अध्यक्ष अॅड. जासिंह सांगळे, संजय कासट, जुगल लोया यांनी स्वत: रक्तदान करत शिबीराचा शुभारंभ केला.
महिला हिरमुसल्या
रक्तदान करण्यासाठी वजनाबरोबरच शरिरातील हिमोग्लोबीनचे प्रमाण 12.5 पेक्षा जास्त असणे गरजेचे आहे. शिबीरासाठी महिला मोठ्या संख्येने आल्या. वजनाने त्यांना रक्तदानासाठी पात्र ठरवले. मात्र, हिमोग्लोबीनचे प्रमाण 12 पेक्षा कमी असल्याने 60 महिलांना रक्तदान करता आले नाही. महाविद्यालयीन मुलीही या परिक्षेत नापास झाल्या. त्यामूळे त्या हिरमुसल्या. जेवणात कुठल्या बाबींचा समावेश केल्यास हिमोग्लोबीन वाढेल याबाबत मार्गदर्शन करणारे पत्रक यावेळी महिलांना देण्यात आले.
वै. बस्तीरामजी सारडा युगपुरुष
वै. बस्तीरामजी सारडा हे युगपुरुष होते. त्यांनी केलेल्या कार्यामुळे आमच्यासारख्यांना उर्जा मिळते, कामासाठी स्फूर्ती मिळते असे अमोल घावरे म्हणाले. रक्तदानाबरोबराच रक्तदानाचं महत्व पटवून देण्याचा उपक्रम सारडा विद्यालयाच्या पूढाकारामूळे सहा वर्षांपासून सुरु आहे. हे काम पूढच्या काळातही असेच अविरत सुरु रहावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
वै. बस्तीरामजी सारडा यांच्या दूरदृष्टीमूळे शहरासह तालुक्यात मुलींचा शिक्षणातला टक्का वाढला आहे. शहरात जिल्हा परिषदेच्या फक्त मुलींसाठी तीन शाळा असतांना सारडा विद्यालयात मुलींचा आकडा दोन आकडी संख्याही गाठू शकत नव्हता. त्यामूळे त्यांनी फक्त मुलींसाठी शाळा सुरु करण्याची सूचना केली. त्यानंतर तालुक्यातील पहिली मुलींची शाळा चांडक कन्या विद्यालय सुरु झाले. तेव्हा विद्यार्थिनींची संख्या 55-56 होती. आज या शाळेतील मुलींची संख्या 1 हजाराच्या वर गेली आहे.
बापूसाहेब पंडित
या संस्थाचा सहभाग
नाईकवाडी कॉलेज ऑफ फार्मसी, माहेश्वरी युवक मंडळ, माजी विद्यार्थी संघ, कुमुदिनी फाउंडेशन, रोटरी क्लब ऑफ गोंदेश्वर, लायन्स क्लब ऑफ सिन्नर युनिटी, ढग्या डोंगर ट्रेकर गृप, सिन्नर सायक्लिस्ट असोसिएशन