येवल्याच्या रक्तदात्याचे केरळच्या रुग्णाला जीवदान
नाशिक

येवल्याच्या रक्तदात्याचे केरळच्या रुग्णाला जीवदान

नाशिकच्या रक्तपेढीने दुर्मिळ गटाचे रक्त पाठविले थेट कोचीला

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी Nashik

येथील एका रक्तपेढीने थेट कोची(केरळ) येथे दुर्मिळ असलेल्या पी-नल ( P-NULL )या रक्तगटाचे रक्त पुरवून एका रुग्णाला जीवदान दिले आहे.

अमृता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (अखचड) कोची, केरळ येथे एका पाच वर्षाच्या बालकाला अपघातामुळे शस्त्रक्रिया करण्यासाठी रक्ताची गरज भासली. परंतु या रुग्णास कोणत्याही रक्तगटाचे रक्त जुळत नव्हते.

रक्ताची चाचणी केल्यानंतर त्या रुग्णाचा रक्तगट हा अतिशय दुर्मिळ गटाचा पी- नल असा आढळून आला. या रक्तगटाचा रक्तदाता हा केरळ राज्यात कोठेही उपलब्ध नसल्याने रुग्णाचा जीव रक्ताअभावी धोक्यात आला होता.

सुदैवाने आयसीएमआर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इम्मुनो हिमाटोलॉजीच्या डॉ.स्वाती कुलकर्णी व एम्स हॉस्पिटलच्या डॉ. विना शीनाँय यांच्या संयुक्त प्रयत्नाने हा रक्तदाता येवला तालुक्यात आढळून आला असता अर्पण रक्तपेढीच्या डॉ. शशिकांत पाटील यांनी या रक्तदात्याशी संपर्क साधून दात्यास रक्तदानाचे महत्त्व पटवून देऊन रक्तदान करण्याचे सुचविले.

रक्तदानाचे महत्व पटल्यामुळे रक्तदाता रक्तदान करण्यास तयार झाला. या रक्तदात्यास रक्तपेढीमध्ये आणण्याची व रक्तदानानंतर परत सोडण्याची वाहनाने व्यवस्था केली. रक्तदानापूर्वी व रक्तदानानंतरच्या महत्त्वाच्या चाचण्या केल्यानंतर सदर रक्तदात्याचे रक्त हे रुग्णाच्या रक्ताशी जुळून आल्याचे डॉ. शशिकांत पाटील यांना आढळले.

ही रक्त पिशवी केरळ येथील अमृता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस हॉस्पिटल येथे विमानाद्वारे पोहोचवण्यात आली व शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. अर्पण रक्तपेढीच्या या कार्याचे व रक्तदात्याचे एम्स हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकार्‍यांनी आभार मानले.

पी-नल अतिदुर्मिळ रक्तगट

कुठल्याही व्यक्तीचे ए (A), बी (B ) , एबी (AB ) , ओ (o) असे रक्तगट साधारणतः आढळून येतात. परंतु याव्यतिरिक्तसुद्धा अनेक अतिसूक्ष्म रक्तगट जसे की डफी(Duff), कीड(Kidd),केल (Kell), पी(P), आयएन(In) असे ४० पेक्षा जास्त रक्तगट अस्तित्वात आहेत. या रक्तगटांची चाचणीही करणे कठीण असते. त्यापैकी पी(P )हा रक्तगट जवळपास सर्व लोकांमध्ये आढळून येतो. परंतु अतिशय तुरळक लोकांमध्ये पी (P) रक्तगट हा दिसून येत नाही व त्या कारणाने ‘पी-नल’(P-NULL) या रक्तगटाला दुर्मिळ समजले जाते.

अशा रक्त गटास केवळ ‘पी नल’ (P-NULL) या रक्तगटाच्याच रक्ताची जुळवणी करता येते.तसेच अर्पण रक्तपेढीने ब्लड ग्रुप असे दुर्मिळ रक्तगट असलेल्या रुग्णांना पुरविले आहे.या रक्तपेढीने यापूर्वी सुद्धा अनेकदा पॅरा बॉम्बे (Para Bombay ), ए२(अ२), ए२ बी(अ२बी ) अशा दुर्मिळ रक्तगट असलेल्या रुग्णांना योग्य ते रक्तदाते शोधून रक्तपुरवठा केला आहे व त्यांना जीवनदान देण्यास मदत केली आहे.

दुर्मिळ रक्तगटाच्या चाचण्या या अर्पण रक्तपेढीचे चेअरमन डॉ. एन. के. तातेड, व्हा. चेअरमन डॉ. अतुल जैन व डॉ. शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व रक्तपेढीतील अत्याधुनिक यंत्रणेद्वारे केल्या जातात.

Deshdoot
www.deshdoot.com