नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक महानगरपालिकेच्या विषय समितीवर भाजपचे नऊ पैकी पाच सदस्य असल्याने बहुमत आहे. असे असतांना विषय समितीतील दोन सभापती पदाची निवडणूक स्थगित झाल्याने भाजप पदाधिकार्यांचा गाफीलपणा समोर आला आहे. केवळ सह्याच्या घोळांमुळे भाजपवर ही नामुष्की आली असे म्हटले तरी यातून मनपातील भाजपचे पदाधिकार्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे. निवडणुक जवळ आलेली असतांना भाजप गंभीर नसल्याचे आणि पक्षांत अंतर्गत गटबाजी असल्याचे यातून आधोरेखित झाले आहे.

गुरूवारी (दि.10) रोजी महापालिकेच्या महिला व बालकल्याणसह विधी, वैद्यकीय सहाय्य-आरोग्य व शहर सुधारणा अशा चारही विषय समिती सभापती व उपसभापती पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. यात शहर सुधारणा समिती व वैद्ययिक सहाय्य आणि आरोग्य समिती या दोन समित्यांची सभापती निवडणूक स्थगित करावी लागली. यात निवडणुकीतून नगरसेवकांचे उमेदवारी अर्ज भरुन घेण्याचे काम सत्ताधारी भाजप पदाधिकार्यांनी गंभीरतेने केले नसल्याचे उघड झाले. इच्छुक नगरसेवकांच्या स्वाक्षर्या न जुळल्यामुळे शहर सुधारणा समितीचे उपसभापती पदाची माळ आपोआप शिवसेनेचे सुदाम ढेमसे यांच्या गळ्यात पडली.

शिवसेनेकडुन जर शहर सुधारणा समिती व वैद्ययिक सहाय्य आणि आरोग्य समिती सभापती पदांचे अर्ज दाखल केले असे तर या दोन्ही सभापती पद देखील सेनेच्या हातात आले असते. मात्र सेनेच्या पदाधिकार्यांनी निवडणूक प्रक्रियेच्या अगोदरच हार मानत आपल्या नगरसेवकांना उमेदवारी अर्ज दाखल करुन दिले नाही. यातून सेना पदाधिकार्यांचा गाफीलपणा समोर आला आहे.

मात्र सेना नगरसेवक यांचा धाडसीपणा कामी आला. निवडणुकीत शेवटच्या क्षणापर्यत काय चमत्कार होतो, अनेक निवडणुकीच्या मतमोजणीतून समोर आले आहे. असे असतांना परवाच्या मनपा विषय समिती निवडणुकीत सत्तारुढ भाजपकडे बहुमत असतांना त्यांचा अतिविश्वासाने उपसभापती पदाची एक जागा गमावली. तर सेनेकडुन सभापती पदासाठी अर्ज दाखल न करण्यामुळे मोठी संधी हुकली. अशाप्रकारे केवळ बहुमत असुन निवडणुकीत चालत नाही, हेच विषय समितीच्या निवडणुकीने राजकिय पक्षांना दाखवून दिले आहे.