भाजप कार्यकर्त्यांनी शाळेला ठोकले कुलूप

प्रशिक्षणासाठी शिक्षकांची दांडी
भाजप कार्यकर्त्यांनी शाळेला ठोकले कुलूप

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

रावळगाव ( Malegaon- Ravalgaon )येथील जि. प. प्राथमिक शाळेत ( Z.P. Primary School - Ravalgaon ) पाचपैकी चार शिक्षक गैरहजर आढळून आल्याने ग्रा. पं. सदस्य तथा भाजयुमोर्चाचे तालुका उपाध्यक्ष राहुल कानडे, भाजप शहराध्यक्ष पंकज कासार (BJP city president Pankaj Kasar )यांनी शाळेला कुलूप ठोकून संताप व्यक्त केला.

प्राथमिक शाळेची वेळ सकाळी 7.30 ते 11 असून शिक्षकांना वेळेवर उपस्थित राहण्याचे बंधन असताना काही शिक्षक वेळेवर उपस्थित न राहता 8 वाजेनंतर शाळेत येतात, अशा तक्रारी प्राप्त झाल्यामुळे कानडे व कासार यांनी गुरुवारी अचानक प्राथमिक शाळेला भेट दिली. यावेळी पाचपैकी चार शिक्षक गैरहजर असल्याचे निदर्शनास आले.

चौकशी केल्यानंतर केंद्र स्तरावर तळवाडे येथे शाळा पूर्वतयारीसंदर्भात एकदिवसीय प्रशिक्षण( One Day Training for Teachers ) शिबिर आयोजित केले असल्याने शिक्षक तेथे गेल्याचे सांगण्यात आले. सदर प्रशिक्षण 11 ते 5 दरम्यान असल्याने शाळेवर हजेरी लावून प्रशिक्षणाला उपस्थित राहावे, असे आदेश होते. तथापि चार शिक्षकांनी शाळेला दांडी मारल्याचे आढळून आले. हजेरी पुस्तकावर शिक्षकांची स्वाक्षरी अथवा रजेसंबंधी कुठलाही उल्लेख नव्हता.

शाळेत एकही विद्यार्थी हजर राहत नसतानादेखील अनेक दिवसांपासून पटावर साधारण 80 ते 90 विद्यार्थी हजर दाखवले जात आहेत. पोषण आहार वाटप केला जात नाही. शासनाकडून विद्यार्थ्यांना गणवेश अनुदान मिळते. मात्र येथील एकाही विद्यार्थ्याला अद्याप गणवेश मिळालेला नाही. शासनाचे कोणतेही उपक्रम न राबवता परस्पर अनुदान गायब केले जाते. शाळेत विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना जन्म दाखले घेणे बंधनकारक असताना कुठल्याही प्रकारची चौकशी न करता अंदाजे नोंद करून शाळेत दाखल करून घेण्यात येते, असा आरोप करत या सर्व तक्रारींची चौकशी करावी, अशी मागणी करून कानडे व कासार यांनी शाळेला कुलूप ठोकले.

यासंदर्भात गटविकास अधिकारी व शिक्षण विस्तार अधिकार्‍यांना निवेदन देत कानडे व कासार यांनी चौकशीची मागणी केली आहे.

दरम्यान, शाळेला कुलूप ठोकणे योग्य नाही. केंद्रस्तरावर तळवाडे येथे शाळा पूर्वतयारीबाबत प्रशिक्षण शिबिरास शिक्षक गेले होते. तथापि प्रशिक्षणास जाण्याआधी शिक्षकांनी शाळेवर जाणे अपेक्षित होते. शिक्षक शाळेवर का गेले नाहीत याबाबत चौकशी केली जाईल, असे आश्वासन शिक्षण विस्तार अधिकारी तानाजी घोंगडे यांनी दिले आहे.

Related Stories

No stories found.