दिंडोरीत भाजपच्यावतीने वीजबिलाची होळी

खासदार डॉ. भारती पवार उपस्थित
दिंडोरीत भाजपच्यावतीने वीजबिलाची होळी


दिंडोरी | Dindori

वीज वितरणने लॉकडाऊन काळात पाठवलेली चुकीची बिले माफ करण्यास नकार दिल्याने भारतीय जनता पक्षाच्या वतीने महाआघाडी सरकारच्या विरोधात खासदार डॉ भारती पवार यांच्या उपस्थितीत दिंडोरी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

लॉकडाऊनच्या काळात राज्यातील नागरिकांना भरमसाठ वीजबिले पाठवली गेली. याबाबत सवलत देण्याचे महाविकास आघाडी सरकारने जाहीर केले होते. पण ऊर्जामत्र्यांनीच स्वतः वीजबिलाबाबत दिलासा देता येणार नाही व नागरिकांना ती भरावी लागतील, असे स्पष्ट सांगितले आहे.

तसेच या भरमसाठ बिलांची वसुली करण्याचेही जाहीर केले आहे. लॉकडाऊनच्या काळात आर्थिक व्यवहार ठप्प झाले होते. परिणामी नागरिकांना फार मोठा आर्थिक ताण सहन करावा लागला. अशा परिस्थितीत राज्यातील आघाडी सरकारने इतर राज्यांप्रमाणे श्रमिक, फेरीवाले, बारा बलुतेदार, शेतकरी, रिक्षाचालक, टॅक्सीचालक या वर्गाला अर्थसाह्य करायला हवे होते.

तसे न करता भरमसाठ वीजबिले पाठवण्यात आली. सरकारच्या या मनमानी विरोधात भाजपाने रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला असल्याने आज दिंडोरीत वीजबिल होळीचे आंदोलन करण्यात आले असल्याचे मत खासदार डॉ भारती पवार यांनी व्यक्त केले.

यावेळी घोषणाबाजी करत विजबिलाची होळी करण्यात आली. यावेळी शिवाजीबाबा पिंगळ, शामराव बोडके, प्रमोद देशमुख, योगेश बर्डे, शाम मुरकुटे, अनिल गाडे, तुषार देशमुख आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com