नाशिक । प्रतिनिधी

माजी आमदार वसंत गिते व सुनील बागूल या दोन्ही नेत्यांच्या घरात पक्षाने उपमहापौेरपद दिले. पक्ष बैठक व महापालिका निर्णयात या दोघांना सन्मानाचे स्थान देण्यात आले. मात्र ऐवढा मानसन्मान देऊनही त्यांनी पक्ष सोडणे खेदजनक असल्याचे सांगत भाजपने गिते व बागूल यांच्या शिवसेना प्रवेशावर हल्लाबोल केला.

गिते व बागूल या दोन्ही नेत्यांनी शुक्रवारी (दि.८) भाजपला रामराम ठोकत शिवसेना नेते तथा उत्तर महाराष्ट्र समन्वयक खा.संजय राउत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. सायंकाळी मातोश्रीवर जाउन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आशीर्वाद घेत शिवसेनेचा भगवा हाती घेतला.

या दोन्ही नेत्याचा सेना प्रवेशाने भाजपला मोठा धक्का बसला. त्यानंतर भाजपने प्रसिध्दीपत्रक काढून या दोन्ही नेत्यांना कसा मानसन्मान देण्यात आल्याचे सांगितले. वसंत गीते व सुनील बागुल यांना भाजपमध्ये सन्मान पूर्वक स्थान असतानाही त्यांचा शिवसेना प्रवेश खेदजनक आहे. या दोन्ही नेत्यांना पक्षाने काहीही कमी केले नाही. संघटनेतही त्यांना मान सन्मानाच दिला गेला.

दोन्ही नेत्यांना भाजप प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. विविध निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग असायचा. दोन्ही नेते नाशिक महानगर भाजप कोअर कमिटी मेंबर म्हणून मानाचे स्थान होते. महापालिकेत पण वसंत गीते याचे पुत्र प्रथमेश यांना उपमहापौर तसेच बागुल यांच्या मातोश्री भिकुबाई यांनाही उपमहापौर पद दिले. मनिष बागुल याना युवा मोर्चा अध्यक्षपद बहाल करण्यात आले.

तर प्रथमेश यांना मागील टर्म मध्ये युवमोर्चा उपाध्यक्ष पद देण्यात आले होते. महापालिकेच्या निवडणूक प्रक्रियेत अंतर्गत समित्यांची निवड असो किंवा महानगरपालिका नगरसेवक उमेदवारांचे तिकिट वाटप असो या प्रक्रियेत बागुल व गीते यांना महत्वाचे स्थान होते.

हे सर्व दिलेले असतानाही त्यांनी पक्ष सोडला. अधिक काही अपेक्षाविषयी दोन्ही नेत्यांनी त्यांचे म्हणने जर प्रदेश नेतृत्वाकडे मांडले असते तर नक्कीच त्यांना न्याय मिळाला असता असे भाजपकडून सांगण्यात आले.

गिते व बागूल यांना पक्षाने सन्मान दिला. परंतु दोन्ही नेत्यांनी त्यांचे म्हणणे प्रदेश नेतृत्वाकडे मांडल्या नाहीत व शिवसेना प्रवेशाचा निर्णय घेतला. दोन्ही नेत्यांनी केलेला शिवसेना प्रवेश ही खेदाची बाब आहे.
गिरीश पालवे, शहराध्यक्ष, भाजप

नेते येतात जातात पण पक्ष कायम असतो. भाजप हा संघटनात्मक पक्ष आहे. दोन खासदारांवरुन हा पक्ष आज देशात सत्तेत आहे. कोणी भाजप सोडून गेल्याने पक्षाला फरक पडनार नाही.
आ. प्रा. देवयानी फरांदे