बिटको कोविड सेंटर 'हाऊसफुल'

480 रुग्णांवर उपचार सुरु
बिटको कोविड सेंटर 'हाऊसफुल'

नाशिकरोड । Nashik

नाशिकरोड परिसरातही करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने बिटको कोविड सेंटरही आता भरले आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी हे कोविड सेंटर रिक्त होण्यास सुरुवात झाली होती.

आता रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागल्याने प्रशासनाने पर्यायी व्यवस्थेसाठी हालचाली सुरु केल्या आहेत. मुक्तीधाममधील तीन इमारतींची या दृष्टीने पाहणी करण्यात आली. रविवारी बिटको कोविड सेंटरमध्ये 480 रुग्णांवर उपचार सुरु होते.

या सेंटरची क्षमता 500 कोविड रुग्णांची आहे. नागरिकांच्या निष्काळीजपणा असाच कायम राहिला आणि त्यांनी योग्य ती खबरदारी घेतली नाही तर करोना संसर्ग वाढू शकतो अशी माहिती सेंटरचे प्रमुख डॉ. जितेंद्र धनेश्वर यांनी दिली.

बिटको कोविड सेंटरमध्ये नवीन लॅब नुकतीच सुरु झाली आहे. तसेच करोना रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडू नये म्हणून ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी महापालिका आयुक्त कैलास जाधव आणि पोलिस आयुक्त दिपक पांड्ये यांनी या रुग्णालयाला भेट देऊन सूचना केल्या होत्या. नंतर नाशिकरोडला दंडात्मक कारवाई केली होती.

बिटको कोविड रुग्णालय जवळजवळ भरत आल्यामुळे प्रशासनाने पर्यायी व्यवस्था शोधण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, कार्यकारी अभियंता उदय धर्माधिकारी, विभागीय अधिकारी डॉ. दिलीप मेनकर, डॉ. जितेंद्र धनेश्वर, उपअभियंता निलेश साळी यांनी मुक्तीधाममधील गोवर्धन निवास, अयोध्या भवन व गोकुळ भवन या भक्त निवासाच्या तीन इमारतींची पाहणी केली.

मुक्तीधामचे विश्वस्त नटवरलाल चौहान व जगदीश चौहान यांच्याशी चर्चा केली. भक्त निवासात कोविड रुग्णांसाठी व्यवस्था करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना वरिष्ठांनी दिल्या.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com