बिटको रुग्णालयातील सीटी स्कॅन मशीन सुरू

बिटको रुग्णालयातील सीटी स्कॅन मशीन सुरू

नाशिकरोड । Nashik

गेल्या अनेक महिन्यापासून येथील बिटको हॉस्पिटलमध्ये बंद असलेले सिटीस्कॅन मशीन अखेर सुरू करण्यात आले असून त्याचा शुभारंभ मनपा आयुक्त कैलास जाधव यांच्या हस्ते करण्यात आला.

सीटीस्कॅन मशिन सुरू करण्यात यावे म्हणून विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आंदोलन केले होते. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बिटको हॉस्पिटलला भेट देऊन सिटीस्कॅन मशिन सुरू करण्यात यावी अशी मागणी केली होती. अखेर या मागणीला यश आले असून आता हे मशीन रूग्णांच्या सेवेसाठी रूजू झाले आहे.

नाशिक शहर व परिसरातील करोनाची परिस्थिती लक्षात घेऊन विविध पातळीवर कामकाज करत असताना रूग्णांना जास्तीत जास्त सेवा सुविधा देण्यावर महापालिका प्रशासनाच्या वतीने भर दिला जात आहे.

या अनुषंगाने बिटको रूग्णालयात सिटीस्कॅन मशिन बसवण्यात आलेले असून त्या ठिकाणी रेडिओलॉजिस्टची नेमणूक करण्यात आली आहे. या सिटीस्कॅन मशिनद्वारे एचआरसीटी प्रती चाचणीचे दर निश्चित केले असून मनपा अंतर्गत दवाखाने, रुग्णालये, प्रसूतिगृहे येथील रुग्णांकरिता एक हजार रुपये व इतर खाजगी दवाखाने, रुग्णालये, प्रसूतिगृहे येथील रुग्णांना रुग्णांकरिता एक हजार पाचशे रुपये इतका दर निश्चित करण्यात आलेला आहे.

तसेच शहरातील रुग्णालयात नातेवाईकांकडून दवाखान्यांमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी विविध सूचना करण्यात आल्या होत्या. त्या सूचनांच्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर आयुक्त कैलास जाधव यांनी यावेळी पाहणी केली.

तसेच तेथील रुग्णांना औषध उपचार, नाष्टा, जेवण, चहापान आदींची व्यवस्था याबाबत सविस्तर आढावा घेऊन सुरक्षेबाबत कठोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना संबंधित विभागास व उपस्थित अधिकार्‍यांना यावेळी आयुक्त जाधव यांनी दिल्या.

यावेळी विभागीय अधिकारी डॉ.दिलीप मेनकर, करोना कक्ष अधिकारी डॉ.आवेश पलोड, बिटको रुग्णालयाचे प्रमुख डॉ.जितेंद्र धनेश्वर आदी उपस्थित होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com