कांद्याच्या भावात मोठी घसरण

उत्पन्नापेक्षा खर्च अधिक; शेतकरी हवालदिल
कांद्याच्या भावात मोठी घसरण

मनमाड । बब्बू शेख | Manmad

कधी अस्मानी तर कधी सुलतानी पाठोपाठ येणारी संकटे शेतकर्‍यांचा (farmer) पिच्छा सोडायला तयार नाहीत. गेल्या आठवड्यात अवकाळी पाऊस (Untimely rain) आणि गारपिटीने (Hail) बळीराजावर अस्मानी संकट कोसळून हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला तर आता कांदा (onion) भावातील घसरणीचा सामना शेतकर्‍यांना करावा लागत आहे.

मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत (Manmad Agricultural Produce Market Committee) कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात गडगडले असून पंधरा दिवसापूर्वी ज्या कांद्याला प्रति किलो 21 रुपये इतका भाव मिळाला, त्याच कांद्याला आज सरासरी 6 रुपये 50 पैसे भाव मिळाला. सध्या मिळणार्‍या भावामुळे पिकासाठी केलेला खर्च देखील निघत नसल्याचे पाहून कांदा उत्पादक (Onion growers) शेतकरी हवालदिल झाला आहे. आवक जास्त आणि मागणी कमी; अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे भावात घसरण होत असल्याचे व्यापार्‍यांचे म्हणणे आहे.

कांदा हे नगदी पिक मानले जात असल्याने मनमाड शहर (manmad city) परिसरासह नांदगाव तालुक्यातील (nandgaon taluka) बहुतांश शेतकरी मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड करतात. गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे (heavy rain) साठवून ठेवलेल्या कांद्यापाठोपाठ कांद्याची रोपे व कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे एका एकरात निघत असलेल्या कांद्याचे उत्पादन 15 ते 20 टक्क्यांवर आले आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात सुधारणा होऊन प्रती क्विंटल कमीतकमी 751 व जास्तीत जास्त 2 हजार 686 रुपये तर सरासरी 2 हजार 225 रुपये इतका भाव मिळत होता. कांद्याला योग्य भाव मिळत असल्याचे पाहून काही प्रमाणात ‘अच्छे दिन’ आल्याचा अनुभव शेतकरी घेत असताना आता मात्र भावात मोठी घसरण सुरु झाली आहे.

आज कांद्याला सरासरी 654 रुपये भाव मिळाला. पंधरा दिवसापूर्वी प्रती किलो 21 रुपये भाव असलेला कांदा आज 6 रुपये 50 पैशावर आला. भावातील मोठी घसरण पाहून कांदा उत्पादक शेतकर्‍यांना धक्का बसला असून तो मेटाकुटीस आला आहे.

कोणतीही वस्तू उत्पादीत करतांना त्याचा भाव ठरविण्याचा अधिकार कारखानदार, व्यापारी, व्यासायीकांना असतो तसा अथक कष्टाने पिकविलेल्या कांद्यासह इतर शेतमालाचा भाव ठरविण्याचा अधिकार आम्हाला का नाही? असा प्रश्न शेतकरी उपस्थिती करीत आहेत. एक किलो कांदा पिकविण्यासाठी कमीतकमी 10 रुपये खर्च येत आहे. त्यामुळे आम्हाला कमीतकमी 15 रुपये किलो भाव मिळायला हवा तरच पिकावर केलेला खर्च निघून आमच्या हाती दोन पैसे पडतील, अशी प्रतिक्रिया शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे.

सध्या बाजारात लाल आणि रांगडा कांद्याची आवक वाढली असून इतर राज्यात देखील कांद्याचे उत्पादन वाढले आहे. त्यामुळे आवक जास्त आणि मागणी कमी असल्यामुळे भावात घसरण होत आहे.

- रूपेश ललवीणी ,कांदा व्यापारी, मनमाड

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com