वसंत व्याख्यानमाला स्वागत समिती अध्यक्षपदी भुसे

वसंत व्याख्यानमाला स्वागत समिती अध्यक्षपदी भुसे

नाशिक । प्रतिनिधी Nashik

सांस्कृतिक क्षेत्राचा मानबिंदू असलेल्या नाशिक वसंत व्याख्यानमालेचा ( Vasant Vyakhyanmala Nashik)मे महिन्यात शताब्दी महोत्सव साजरा होत आहे. यानिमित्ताने स्वागत समिती अध्यक्षपदी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse )यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

व्याख्यानमालेचे शताब्दी वर्ष मे -2023 मध्ये भव्यदिव्य स्वरूपात साजरे करण्यात येणार आहे. त्याकरिता समाजाच्या विविध घटकातील प्रतिनिधींचा समावेश असलेली स्वागत समिती स्थापित करण्यासाठी वसंत व्याख्यानामालेच्या सभागृहात बैठक झाली. यावेळी माजी अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली.

यावेळी अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी सांगितले की, वसंत व्याख्यानमालेचा शताब्दी वर्ष महोत्सवाच्या उद्घाटन व समारोपाकरिता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करण्यात आले आहे. यंदा व्याख्यानमालेत जगाच्या विविध देशांमध्ये उत्तुंग कामगिरी करणारे 10 विचारवंत आपले विचार मांडणार आहेत. त्याचबरोबर भारताच्या विविध राज्यातील 10 नामवंत वक्ते व्याख्यानासाठी येणार आहेत. स्थानिक कलावंत आणि विचारवंतांनादेखील संधी देण्यात येणार आहे. यु ट्यूब, फेसबुक, केबल नेटवर्क, सोशल मिडिया याद्वारे व्याख्यानांचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. त्यामुळे आपल्या व्याख्यानामालेची किर्ती जगभरात पोहोचणार आहे.

यावेळी भुसे म्हणाले की, नाशिकची वसंत व्याख्यानमाला संपूर्ण भारत देशाचे भूषण आहे. त्यामुळे या व्याख्यानमालेचे शताब्दी वर्ष आपण सर्वजण अत्यंत उत्साहात आणि थाटात साजरे करू. यासाठी महाराष्ट्र शासन, नाशिक महानगरपालिका आणि नाशिककर नागरिक सर्वतोपरी आपले योगदान देतील. शताब्दी वर्षातील कार्यक्रमांची आठवण पुढील 25 वर्षे नागरिक काढतील एव्हढे सुंदर नियोजन करणार आहोत.

नरेडकोचे सेक्रेटरी सुनील गवादे यांच्या हस्ते भुसे यांचा सत्कार करण्यात आला. चांदवड येथील श्री नेमीनाथ जैन शिक्षण संस्था प्रबंधक समितीचे अध्यक्ष अजित सुराणा यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल भुसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी माजी आमदार निशिगंधा मोगल, बाळासाहेब सानप, माजी महापौर दशरथ पाटील, माजी उपमहापौर अजय बोरस्ते, महापालिका आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल, प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विद्यालयाच्या प्रमुख वासंती दिदी, भुजबळ नॉलेज सिटीच्या संचालिका शेफाली भुजबळ, अंकुश पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

मालेच्या चिटणीस संगिता बाफणा यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी स्मृती व्याख्यान योजनेचे देणगीदार अविनाश गोठी, पुष्कर वैशंपायन, अरुण नेवासकर, सुलोचना हिरे, डॉ. शोभा नेर्लीकर, मंडलेश्वर काळे, नवलनाथ तांबे, गणेश भोरे, डॉ. विक्रांत जाधव, कुणाल देशमुख उपस्थित होते. मालेचे उपाध्यक्ष विजय हाके यांनी प्रास्ताविक केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com