भोजापूर धरणातून उन्हाळी आवर्तन सुटले; सिन्नरवासियांना दिलासा

file photo
file photo

सिन्नर । वार्ताहर

भोजापूर धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी उन्हाळी आवर्तन सोडावे यासाठी गेल्या 15 दिवसांपूर्वीच तहसीलदार राहुल कोताडे यांच्याकडे निवेदन देत पाठपुरावा केला होता. त्यामुळे आपल्या प्रयत्नांना यश आले असून काल (दि.3) पासून भोजापूरचे आवर्तन सुटले असल्याची माहिती पंचायत समितीच्या सभापती शोभा बर्के यांनी दिली...

माजी आमदार राजाभाऊ वाजे, युवा नेते उदय सांगळे यांनी पिण्याच्या पाण्यासाठी भोजापूर धरणाचे नियोजन व्हावे यासाठी सभापती बर्के यांना सूचना केली होती. बर्के यांनी तहसीलदार कोताडे यांना निवेदन देण्याबरोबरच पाटबंधारे विभाग व खासदार हेमंत गोडसे यांच्याशी चर्चा केली.

संगमनेर तालुक्यातील लाभार्थी गावे यात समाविष्ट असल्याने सभापती बर्के यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडेही आवर्तनासाठी मागणी केली होती. खासदार गोडसे यांनी जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्याशी चर्चा करून पाणी सोडण्याचे नियोजन केले.

15 दिवसापूर्वी धरणात 136 दशलक्ष घनफूट पाणीसाठा होता. आता तो 16 दशलक्ष घनफूटाने कमी झाला आहे. धरणातील 120 दशलक्ष घनफूट उपयुक्त साठ्यापैकी मनेगावसह 16 गावे योजनेकरिता व कणकोरीसह 5 गावे योजनेकरिता 31 जुलैपर्यंत पुरेल अशा बेताने 32 दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित आहे.

ते वगळून उर्वरित पाणी नियोजन करण्याच्या सूचना मांढरे यांनी पाटबंधारे विभागाला केल्या आहेत. सभापती बर्के यांनी आपल्या नांदुरशिंगोटे गणात पाणीटंचाईची स्थिती गंभीर असल्याचे अधिकार्‍यांना पटवून दिले होते.

लाभार्थी गावांतील ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सोडविण्यासह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍नही सोडवण्यासाठी परिसरातील साठवण तलाव, बंधारे भरण्याची मागणी त्यांनी केली होती.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे आवर्तन सोडण्याची गरज असल्याबाबत चर्चा केली. यावेळी थोरात यांनीही अधिकार्‍यांना याबाबत सूचना करण्याचे आश्‍वासन दिले होते.

त्यानुसार किमान 70 दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात येत असून आठ दिवस आवर्तन सुरु राहिल असे सभापती बर्के म्हणाल्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com