
नाशिक | Nashik
भारतातील नामवंंत दिग्दर्शक, अभिनेते आणि नाट्यसमूहांची अनेक नाटके पाहण्याची अनोखी संधी देणारा 22 वा भारत रंग महोत्सव अर्थात भारंंगम यंदा नाशिकमध्ये दि. 18 ते 23 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. महाराष्ट्रातून यंदा फक्त नाशिकची निवड या महोत्सवासाठी झाल्याने नाशिककरांना मोठी पर्वणीच यामुळे लाभली आहे...
या महोत्सवात बॉलीवूडमधील ख्यातनाम दिग्दर्शक, नाट्य व्यक्तीदेखील सहभागी होणार आहेत. या रंंग महोत्सवा मध्ये पारंपारिक आणि समकालीन नाटकांसोबतच लोकनाट्य आणि शास्त्रीय नाटकांचाही समावेश करण्यात आला आहे.
नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा तर्फे आयोजित नाट्य महोत्सव, 14 ते 26 फेब्रुवारी दरम्यान आयोजित केला जाणार आहे. नाशिक महापालिकेच्या सौजन्याने महाकवी कालिदास कला मंंदिरात हा महोत्सव रंगणार आहे.
संपूर्ण भारतामध्ये 81 नाटके सादर केली जातील. मुख्य स्थान दिल्ली असेल. जयपूर, भोपाळ, श्रीनगर, जम्मू, रांची, गुवाहाटी, नाशिक, राजामुंध्री आणि केवडिया येथे एकाच वेळी उत्सव आयोजित केले जातील.
करोनामुळे यावर्षी कोणताही परदेशी सहभागी होणार नाही. नाशिकमधील महोत्सवात कोण कोण कलाकार सहभागी होतील? ते कोणती नाटके सादर करतील हे लवकरच जाहीर केले जाईल, असे भारंंगमचे संयोजक सुरेश गायधनी यांनी देशदूतशी बोलताना सांगितले.