सायबर भामट्यांपासून सावध राहा; महावितरणचे आवाहन

सायबर भामट्यांपासून सावध राहा; महावितरणचे आवाहन

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

महावितरणच्या ग्राहकांची फसवणूक होऊ नये. यासाठी कंपनी एसएमएस किंवा ऑनलाईन बिले भरण्याची सुविधा सुरक्षित असेल याची दक्षता घेत असते. ग्राहकांनी महावितरणची कार्यपद्धती समजून घ्यावी. ग्राहकांनी अनोळखी क्रमांकावरून येणार्‍या बनावट मेसेजना बळी पडू नये व वीजग्राहकांना लुटणार्‍या सायबर भामट्यांपासून सावध रहावे, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी केले.

यावेळी सिंघल म्हणाले की, बनावट संदेश पाठवून खासगी व सार्वजनिक वीज कंपन्यांच्या ग्राहकांची फसवणूक झाल्याच्या बातम्या आहेत. फसवणूक रोखण्यासाठी ग्राहकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. महावितरण नियमितपणे ग्राहकांना जागृत करण्यासाठी विविध माध्यमातून माहिती देत असते. ग्राहकांनी त्याची नोंद घ्यावी. तसेच इतरांनाही सावध करावे. बनावट संदेशाद्वारे होणारी फसवणूक कशी रोखता येईल याबाबत महावितरणने कंपनीच्या वेबसाईटवर माहिती दिली आहे तसेच महावितरणच्या अँपवर माहिती दिली आहे.

महावितरणकडून ग्राहकांना जो एसएमएस पाठविला जातो त्यामध्ये मेसेज पाठविणार्‍याचा नावात स्पष्टपणे एमएसईडीसीएल असा कंपनीचा उल्लेख असतो. महावितरण कधीही खासगी क्रमांकावरून एसएमएस किंवा व्हॉट्स अँप संदेश पाठवत नाही. महावितरणची बिले ऑनलाईन भरण्यासाठी अधिकृत वेबसाईट किंवा अँपवर सुविधा असून लाखो ग्राहक तिचा वापर करत आहेत. पण महावितरण बिलासाठी एखाद्या नंबरवर अधिकार्‍यास संपर्क साधण्यास सांगत नाही. महावितरण कोणालाही फोनवरून ओटीपी विचारत नाही.

सायबर भामट्यांकडून पाठवलेल्या वैयक्तिक नंबरवर ग्राहकाने संपर्क साधला तर त्याला त्याच्या कॉम्प्युटर किंवा मोबाइलचा ताबा घेता येईल असे एनीडेस्क किंवा तत्सम अँप डाऊनलोड करण्यास सांगितले जाते किंवा एखादी बनावट लिंक पाठविली जाते. त्याचा वापर करून भामटे ग्राहकाची बँकेविषयीची गोपनीय माहिती चोरतात आणि फसवणूक करतात. ग्राहकांनी ओटीपी शेअर केला नाही तर फसवणूक रोखण्यास मदत होईल.

ग्राहकाने वीजबिल थकविले तर त्याचा वीजपुरवठा पूर्वसूचना देऊन खंडीत करण्याची महावितरणची नियमित पद्धती आहे. ताबडतोब बिल भरा नाहीतर रात्री वीजपुरवठा खंडित करू असे धमक्या दिल्यासारखे संदेश महावितरण कधीही पाठवत नाही. आर्थिक फसवणुकीच्या हेतूने वीज ग्राहकांना बनावट मेसेज पाठविण्यात येत असल्याचे निदर्शनाला आल्यापासून महावितरणने त्याविरोधात कारवाईसाठी एक वर्षापेक्षा अधिक काळापासून अनेक पावले उचलली आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com