शासन योजनांचा लाभ प्रत्येक घरापर्यंत

आ. बोरसेंचे प्रतिपादन
शासन योजनांचा लाभ प्रत्येक घरापर्यंत

सटाणा । प्रतिनिधी Satana

समाजातील शेवटच्या घटकाचा विकास झाल्याशिवाय देशाची प्रगती होवू शकत नाही.

हे लक्षात घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेवटच्या घटकाच्या विकासासाठी लक्ष केंद्रित केले आहे.हाच मंत्र घेऊन आपण शासनाच्या कल्याणकारी योजना प्रत्येक घरापर्यंत पोहोचवत आहोत. जातीचे दाखले, रेशनकार्ड आदींसह विविध योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्याचा आपला प्रयत्न सुरू असल्याचे प्रतिपादन आ. दिलीप बोरसे यांनी केले.

बागलाण तालुक्यातील टिंगरी या आदिवासी पाड्यावरील ग्रामस्थांना आत्मनिर्भर भारत संवाद अभियान सप्ताहाच्या समारोपानिमित्त राष्ट्रपिता महात्मा गांधी व पंडित दिनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीचे औचित्य साधून तब्बल दोनशे ग्रामस्थांना जातीच्या दाखल्यांचे वाटप आ. बोरसे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

गेल्या 20 ते 25 वर्षांपासून तहसील कचेरीत हेलपाटे मारूनही जातीचे दाखले न मिळाल्याने नाउमेद झालेल्या टिंगरी येथील आदिवासी पाड्यावरच्या नागरिकांना आज जातीच्या दाखल्यांचे वाटप करतांना मनस्वी आनंद होत असल्याचे स्पष्ट करत आ. बोरसे पुढे म्हणाले. गेल्या महिन्यापासून प्रत्येक गावाच्या समस्या तसेच शासनाच्या लोककल्याणकारी योजना प्रत्येक घरापर्यंत पोहचविण्याच्या दृष्टीने प्रत्येकाकडे रेशनकार्ड, शेषनकार्ड आणि जातीचे दाखले उपलब्ध करून देण्यासाठी ‘आमदार आपल्या दारी’ हा अभिनव उपक्रम हाती घेतला असल्याचे स्पष्ट केले. जातीचे दाखले विनाविलंब उपलब्ध करून दिल्याबद्दल आ. बोरसे यांनी प्रांत, तहसीलदारांसह महसूल यंत्रणेचे आभार मानले.

यावेळी मार्गदर्शन करतांना प्रांत विजयकुमार भांगरे यांनी आदिवासींना शासनाच्या कोणत्याही योजनेच्या लाभासाठी जातीचे दाखले, रेशनकार्ड याची आवश्यकता असते. मात्र बहुतांश आदिवासींकडे आवश्यक कागदपत्रे नसल्यामुळे वर्षानुवर्ष ते शासकीय योजनांपासून वंचित आहेत. अशा आदिवासींनी या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. तहसीलदार जितेंद्र इंगळे यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून धर्मजागरण समिती जिल्हा प्रमुख प्रदीप बच्छाव, विस्तार अधिकारी भैयासाहेब सावंत, मंडळ अधिकारी खरे, अहिरे, माजी पं.स. सदस्य अभिमन ठाकरे, सचिन हिरे आदी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com